Breaking News

मुख्यमंत्र्यांना इतके दिवस हेलिकॉप्टर मिळालं नाही का ? कुठल्याही निकषांशिवाय तात्काळ मदत जाहीर करावी - भाजपची मागणी

तळीये-चिपळूण: प्रतिनिधी

गेल्या ४ दिवसांपासून राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराने, दरड कोसळलेल्या दुर्घटनांनी होत्याचं नव्हतं झालंय. आताची परिस्थिति अतिशय भीषण आहे. नुकसानग्रस्तांना थेट मदत मिळायला हवी. राज्याला विशेष मदत जाहीर करायला पाहिजे. नेहमीचे मदतीचे निकष आता लागू होणार नसून कुठल्याही निकषांशिवाय राज्य सरकारने तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली असून ते यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचेही त्यांनी माध्यामांशी बोलताना सांगितले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज आज पूरग्रस्त भागाची पाहणी केली. कोकणातील पूरग्रस्त भागाच्या दौ-याचा प्रारंभ आज महाड मधील तळये या गावांतून केला. यावेळी त्यांनी दुर्घटनाग्रस्तांची विचारपूस करून त्यांचं सांत्वन केलं. तसेच चिपळूण येथे नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांशी चर्चा केली असून व्यापऱ्यांना धीर  देण्याचं काम त्यांनी केलं. त्यावेळी माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांच्या पुनर्वसनासाठी केंद्र सरकार मदत करेल. पंतप्रधान आवास योजना आणि एनडीआरएफचं अनुदान घरे बांधण्यासाठी देण्यात येईल. नुकसानग्रस्तांना ज्या प्रकारची मदत हवी ती केंद्राकडून मिळेल, असं आश्वासनही फडणवीस यांनी दिलं.

आम्ही पाहायला आलो नाही, सर्वतोपरी मदत देणार

चिपळूणच्या बाजारपेठेत भयावह परिस्थिती आहे. तिन्ही बाजूनी पाणी बाजारपेठेत शिरलं होतं. त्यामुळे व्यापाऱ्यांच मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला अहवाल द्यायला सांगितलं आहे. आम्ही पाहायला आलो नाही, सर्वतोपरी मदत देणार. विमा कंपन्यांनी आगाऊ रक्कम देण्याची व्यापाऱ्यांची मागणी आहे. तसेच, नुकसान झालेल्या पुनर्वसन करण्याची मागणी केली असून राज्य सरकारने तातडीने मदत करावी अशी मागणीही व्यापाऱ्यांनी केली. आमच्या घरातली माणसं बेघर झाली. सरकारने भरपाई द्यायला हवी. ही आमची माणसं आहेत त्यांच्या डोळ्यात पाणी येऊन देणार नाही, असेही केंद्रीय मंत्री राणे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांना इतके दिवस हेलिकॉप्टर मिळालं नाही का ?-राणे

येथील प्रशासन बेजबदार आहे, त्यांना प्रोटोकॉल सुद्धा माहिती नाही. बेजबाबदारांवर कारवाई होणार, बेजबाबदर अधिकारी आमच्या चिपळूण मध्ये नको असे सांगतानाचं आमच्या दौऱ्याच्या माहितीनंतर त्यांचा दौरा ठरला अशी खोचक टीकाही राणे यांनी केली. संकट काळात राज्यात मुख्यमंत्री नाही, प्रशासन नाही. भयावर परिस्थिती आहे. आज दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांना इतके दिवस हेलिकॉप्टर मिळालं नाही का ? सरकारने लोकांच्या जेवणाची व्यवस्था केली नाही. राज्याने मदत मागण्या आधी केंद्राने मदत केली. तसेच, आज जे राज्यावर संकट आहे ते मुख्यमंत्र्यांचा पायगुणामुळे असावं अशी टीकाही राणे यांनी केली.

कुठल्याही निकषांशिवाय तात्काळ मदत जाहीर करावी

आताची परिस्थिति अतिशय भीषण आहे. नुकसंग्रस्तांना थेट मदत मिळायला हवी. राज्याला विशेष  मदत जाहीर करायला पाहिजे. नेहमीचे मदतीचे निकष आता लागू होणार नाही. कुठल्याही निकषांशिवाय  तात्काळ मदत द्यावी. त्यामुळे  तात्काळ मदतीसाठी मी मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले. तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, तळीये येथे घटना घडल्यानंतर विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर सर्वांत आधी या ठिकाणी पोहोचले. जागरूक लोकप्रतिनिधी म्हणून विरोधी पक्षनेते म्हणून प्रशासन लवकर पोहोचेल असा प्रयत्न त्यांनी केला. आज एनडीआरएफ युद्धपातळीवर काम करत आहे. अडचणीचं काम आहे. दोन किलोमीटर अंतरावर मृतदेह गेले आहेत. या मृतदेहांचा शोध घेण्याचं काम सुरू आहे. जिल्हाप्रशासन असो किंवा पोलिस प्रशासन सर्वांचा समन्वय पाहायला मिळत आहे. परिस्थिती पाहता सध्या ढिगारा व चिखलातून मृतदेह बाहेर काढणं अत्यंत महत्वाचं आहे, त्यानंतर पुनर्वसनांकडे गांभीर्याने लक्ष देऊ असं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पक्की घरं बांधून देणार

ही अत्यंत दुखद घटना आहे. या दुर्घटनेत ८७ लोक गेल्याचं कळतं. ४४ बेपत्तांना शोधण्याचं काम सुरू आहे. अधिकारी-कर्मचारी प्रामाणिकपणे काम करत आहेत. या घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना केंद्र आणि राज्याने मदत दिली आहे. या दुर्घटनाग्रस्तातील सर्वाचं पुनर्वसन करण्यात येईल. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत त्यांना मदत दिली जाणार आहे. सर्वांना पक्की घरं बांधून दिली जाईल असा विश्वास केंद्रीय मंत्री नारायण राणे येथील जनतेला दिला.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *