Breaking News

बिल थकविल्याप्रकरणी सदाभाऊ खोत म्हणाले, तो तर राष्ट्रवादीचा कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याचेच कट कारस्थान

कटकारस्थान रचून आमचा आवाज दाबणार असाल तर आम्ही शांत बसणार नाही. जागर शेतकऱ्याचा आक्रोश महाराष्ट्राचा यात्रेदरम्यान हे सरकार मला खोट्या केसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत आहे, असं मी सांगितलं होतं. त्याचाच हा ढळढळीत पुरावा समोर आलेला आहे. म्हणूनच राष्ट्रवादीला मी इशारा देतो. तुमचा पक्ष हा सरदारांचा पक्ष आहे. चिरेबंदी वाड्यात राहणाऱ्यांचा पक्ष आहे. तुमचे वाडे आम्ही उद्ध्वस्त करणारच. ही लढाई गावगाडा विरुद्ध वाडा अशी आहे. ही लढाई आम्ही आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहू. तुम्ही कितीही कटकारस्थाने करा, आम्ही त्याला भीक घालणार नाही. आम्ही त्याला घाबरणार नाही असा इशारा भाजपा समर्थक आमदार सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला दिला.

२०१४ सालापासून हॉटेलचं बील थकवल्याचा आरोप करून एका हॉटेल मालकाने १७ जून रोजी रयत क्रांती संघटनेचे नेते तथा भाजपा समर्थक माजी मंत्री भाऊ खोत यांचा ताफा अडवला होता. त्यानंतर या घटनेचे काही व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले होते. या हॉटेल मालकाने सदाभाऊ खोत यांनी माझ्या हॉटेलचे ६६ हजार रुपये थकवल्याचा आरोप केला. या आरोपानंतर सदाभाऊ खोत यांनी या हॉटेल मालकाचे सर्व आरोप फेटाळून लावले असून माझ्यावर खुनी हल्ला करण्याचा हा राष्ट्रवादीचा प्लॅन होता असा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला.

हॉटेल मालक खोटं बोलत आहे. मी त्याचे पैसे थकवले नाहीत. निवडणूक झाल्यानंतर २५ दिवस प्रचाराचा काळ नसताना हा माणूस जेवण देत होता. ज्या कागदावर त्याने टिपण तयार केलं त्या कागदाला नऊ वर्षे झाली तरी त्याला घडी पडली नव्हती. नऊ वर्षापर्यंत हा माणूस काही बोलला नाही. या माणसाने ज्या तारखा सांगितल्या त्या मतदानानंतरच्या होत्या. या तारखा देताना राष्ट्रवादीने मतदान कधी होतं हे तरी बघायचं होतं असा टोलाही त्यांनी लगावला.

निवडणूक झाल्यानंतर हॉटेल मालकाने मला फोन केला होता. पण मी माझ्या पीएला फोन करा असं त्यांना सांगितलं होतं, असा आरोप ते करतात. पण २०१६ साली मी आमदार झालो. मी आमदार कधी झालो हे तरी जाणून घ्यायचं होतं. राष्ट्रवादीने हे कुभांड रचलं. पक्षाचे कार्यकर्ते थेट अंगावर आले असते तर राष्ट्रवादीने हल्ला केला म्हणून राज्यात नाचक्की होईल, असी भीती होती. म्हणूनच प्लॅनिंग तयार करण्यात आली. हॉटेलवाल्याने तिथे जायचं. हॉटेलचं बील राहिलं म्हणून बोलत राहायचं. त्यानंतर माझ्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली तर माझ्यावर खुनी हल्ला करायचा, हा ठरलेला प्लॅन होता. पण त्यांचा हा प्लॅन यशस्वी होऊ शकला नाही. या कटामागे टोमॅटोसारखे गाल असणारा राष्ट्रवादीचा नेता आहे असा आरोपही त्यांनी केला.

आता मात्र पितळ उघडं झालं आहे. हा राष्ट्रवादीचाच कार्यकर्ता हॉटेलचा मालक आहे, हे स्पष्ट झालं आहे. मी मंत्री असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने माझ्यावर हल्ला केला होता. जागर शेतकऱ्याचा आक्रोश महाराष्ट्राचा या यात्रेवेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सोलापूरच्या रेस्टॉरंटमध्ये माझ्यावर हल्ला करण्यासाठी आले होते असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Check Also

काँग्रेसचे प्रत्युत्तर, डॉ मनमोहन सिंह यांच्याबद्दल नरेंद्र मोदींनी केलेले विधान असत्य …

देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुस्लिमांचा आहे आहे असे डॉ. मनमोहन सिंह यांनी कधीच म्हटलेले नाही. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *