Breaking News

आदित्य ठाकरेंना भाजपाने पाच प्रश्न विचारत दिले आव्हान, आधी प्रकल्पाची जागा दाखवा

घराण्याच्या वारशातून शिवसेनेचे नेतेपदाची माळ गळ्यात पडलेले आदित्य ठाकरे यांच्या वेदान्ता फॉक्सकॉन प्रकल्पाविषयीच्या आक्रोशाचे पितळ येत्या शनिवारी ते स्वतःच उघडे करणार आहेत. या प्रकल्पाबाबत ठाकरे सरकारने अडीच वर्षात काहीही प्रयत्न केले नसल्याचा पुरावा आदित्य ठाकरे स्वतःच येत्या शनिवारी तळेगावजवळ आयोजित केलेल्या आंदोलनातून देणार असल्याने त्यांच्या आंदोलनाची महाराष्ट्र वाटच पाहात आहे, अशी खोचक टीका प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज पत्रकारांशी बोलताना केली.

मतदारांचा कौल खुंटीवर टांगून फसवणुकीने मिळविलेली सत्ता आणि प्रकल्पाच्या वाटाघाटींचा वाटा या दोन्ही बाबी हातून गेल्याने ठाकरे पितापुत्रांना नैराश्याने ग्रासले आहे. तळेगावजवळ जेथे हा प्रकल्प येणार असल्याचे त्यांच्याकडून सांगितले जात आहे, त्याबाबत साधा सामंजस्य करारदेखील ठाकरे सरकारने केलाच नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आता आदित्य ठाकरे या प्रकल्पाच्या नियोजित स्थळी आंदोलन करणार असल्याच्या वावड्या शिवसेनेकडून उठविल्या जात आहेत. त्यामुळे, आधी या प्रकल्पासाठी राखून ठएवलेली जागा दाखवा आणि मगच आंदोलन करा, असे आव्हानही त्यांनी दिले.

तळेगावातील भूसंपादन फॉक्सकॉनच्या नियोजित प्रकल्पासाठी नव्हे, तर एमआयडीसीच्या नियोजित टप्पा-४ प्रकल्पासाठी करण्यात आले होते. ही जमीन फॉक्सकॉन प्रकल्पासाठी असल्याचे संबंधित जमीन मालकांनाही माहीत नाही, त्यामुळे प्रकल्पाची नियोजित जागा व त्यासंबंधीच्या अधिकृत सरकारी नोंदी अगोदर ठाकरे यांनी दाखवाव्यात, असेही ते म्हणाले. ठाकरे पितापुत्रांना महाराष्ट्राची माहिती नाही. वडिलोपार्जित नेतृत्वाच्या वारशातून राज्यावर हक्क सांगणाऱ्या ठाकरे कुटुंबाने आपल्या सत्ताकाळात फॉक्सकॉन प्रकल्पासाठी नेमकी जागा अधिसूचित केली असती, तरी या प्रकल्पासाठी काही केल्याचे श्रेय त्यांना मिळाले असते. पण वाटाघाटींच्या नावाखाली वेगळ्याच हालचालींचा सुगावा लागल्यामुळेच फॉक्सकॉनने महाराष्ट्रातून काढता पाय घेतला असा आरोपही त्यांनी केला.

आदित्य ठाकरेंना पाच प्रश्न

फॉक्सकॉनचा प्रकल्प तळेगावजवळ नियोजित होता, असे आदित्य ठाकरे वारंवार सांगत आहेत. त्यामुळे, तळेगावातील कोणती जागा या प्रकल्पासाठी ठाकरे सरकारने देऊ केली होती, त्यासंबंधी विशिष्ट जागेच्या महसुली नोंदी केल्या गेल्या होत्या का, या प्रकल्पासाठी ठाकरे सरकारने किती वेळा अधिकृत बैठका घेतल्या, त्यामध्ये कोणत्या वाटाघाटी झाल्या, ठाकरे सरकारने या प्रकल्पासाठी वेदान्ता-फॉक्सकॉनला कोणत्या सवलती दिल्या, या प्रश्नांची उत्तरे आदित्य ठाकरे यांनी आंदोलनाआधी महाराष्ट्रास द्यावीत, असेही उपाध्ये म्हणाले. ज्या ठिकाणी ते आंदोलन करणार आहेत, त्या जागेवर नियोजित प्रकल्पाची नोंद आहे ना याची अगोदर खात्री करून घ्यावी, अन्यथा भलत्याच ठिकाणी आंदोलन करून महाराष्ट्राची फसवणूक करण्याचा प्रयत्नच फसेल व पुन्हा पितळ उघडे पडेल असा टोलाही त्यांनी मारला.

Check Also

गडकरींकडून आदर्श आचारसंहितेचा भंग, गडकरी व आमदार मोहन मतेंवर गुन्हा नोंदवा

भारतीय जनता पक्ष सर्वकायदे धाब्यावर बसवून सातत्याने आचारसंहितेचा भंग करत आहे. भारतीय जनता पक्षाचे नागपूर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *