Breaking News

नितेश राणेंचे “त्या” वक्तव्याने विधानसभेत भाजपा आली अडचणीत सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामनेः सभागृहाचे कामकाज तहकूब

मराठी ई-बातम्या टीम

शिवसेना नेते तथा राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना उद्देशून म्यावं-म्यावं असा दुसऱ्यांदा बोलल्यावरून शिवसेनेचे नाशिकचे आमदार सुहास कांदे यांनी नितेश राणे यांना निलंबन करण्याची मागणी केली. या मुद्यावरून भास्कर जाधव आणि भाजपाच्या सदस्यांमध्ये तुंबळ शाब्दीक चकमकी होवून सत्ताधारी आणि विरोधी बाकावरील विरोधक समोरासमोर आल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. तर भाजपा चांगलीच अडचणीत आल्याचे चित्र सभागृहात पाह्यला मिळाल्याने अखेर विधानसभेचे कामकाज १० मिनिटासाठी तहकूब करावे लागले.

प्रश्नोत्तराचा तास झाल्यानंतर शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी माहितीच्या मुद्याद्वारे (पाँईट ऑफ इन्फॉर्मेशन) खाली मुद्दा उपस्थित करत म्हणाले की, विधान भवन परिसरात आणि सभागृहात कोणत्याही सदस्याचा अवमान होईल किंवा गैरवर्तन होणार नाही या मुद्यावर मागील आठवड्यात विधानसभेत चर्चा झाली. त्यानंतरही भाजपा आमदार नितेश राणे यांनी पुन्हा विधान भवन परिसरात प्रसार माध्यमांशी बोलताना आधी बोलल्या गोष्टींचा पुर्नरूच्चार केला. त्यामुळे राणे यांचे निलंबन करावे अशी मागणी केली. त्यांच्या या मागणीला शिवसेना गटनेते सुनिल प्रभू यांनीही त्या संदर्भात अशीच मागणी केली.

त्यानंतर या संदर्भात भास्कर जाधव बोलताना म्हणाले, भाजपाच्या १२ सदस्यांना निलंबित केले. त्यावेळी मी योगायोगाने तालिका अध्यक्ष म्हणून सभापतींच्या खुर्चीवर होता. त्यानंतर विधान भवनाच्या पायऱ्यावर भाजपाकडून आंदोलन करण्यात येत होते. त्या कालावधीत नितेश राणे यांनी भास्कर जाधव हा कुत्रा असून त्याला दोन बिस्कीटे दिली की तो येतो असे चंद्रकांत पाटील यांना सांगत होते. मग मागच्या सरकारच्या काळात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या १९ आमदारांना निलंबित केले त्यावेळचे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याबाबत हेच म्हणायचे होते का? असा सवाल केला.

त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी भास्कर जाधव यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेतला. त्यावरून भास्कर जाधव यांच्या विरोधात भाजपाचे सदस्यांनी घोषणा देण्यास सुरुवात करत अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत जमा झाले. त्यावर सत्ताधारी बाकावरील शिवसेनेच्या सदस्यानीही घोषणाबाजी करत अध्यक्षासमोरील मोकळ्या जागेकडे सरकू लागले. अखेर पीठासीन अधिकाऱ्यांनी सभागृहाचे कामकाज १० मिनिटासाठी तहकूब केले.

सभागृहाचे कामकाज सुरु झाल्यानंतर पुन्हा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भास्कर जाधव यांच्या वक्तव्यावरील आक्षेप असल्याचे सांगत सभागृहाबाहेरील घटनांवरून सभागृहातील आणखी एका सदस्याला निलंबित करण्याचा डाव सरकारचा असल्याचा आरोप केला. तसेच सभागृहाचे कामकाज पुढे सुरु चालवावे अशी मागणी केली.

त्यावर भास्कर जाधव म्हणाले की, मी माजी विधानसभआ अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या विरोधात कोणतेही वक्तव्य केलेले नाही. तसेच नितेश राणे यांच्या निलंबनाची मागणीही केली नाही. त्यामुळे माझ्या वक्तव्यावर आक्षेप घेण्याचे कारण नाही असे स्पष्ट केले.

त्यानंतर भाजपाचे चंद्रकांत पाटील म्हणाले की, जशी तुमच्याकडे नितेश राणे यांच्या वक्तव्याची क्लिप आहे. तशी आमच्याकडेही देवेंद्र फडणवीस यांनी राणे यांना समज दिल्याची क्लिप आहे. त्यामुळे हा विषय फारसा न ताणता संपवावा आणि सभागृहाचे कामकाज पुढे चालवावे अशी मागणी करत कोणत्याही पक्षाच्या सदस्याने कोणत्याही सदस्याचा अवमान करू नये यासाठी अधिवेशनानंतर एक बैठक बोलवावी आणि त्यासंदर्भात आचारसंहिता तयार करावी अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

त्यावर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक म्हणाले की, नितेश राणे हे सध्या सभागृहात नाहीत. त्यामुळे त्यांनाही त्यांची बाजू मांडण्याची संधी द्यावी आणि त्यांनी चूक केली असेल तर त्यांना सभागृहात दिलगीरी व्यक्त करायला लावून हा विषय संपवावा अशी सूचना करत भाजपाने त्यांना समज द्यावी असे सांगितले.

Check Also

भाजपा आमदार नितेश राणेंना उच्च न्यायालयाकडून धक्का आणि दिलासा २७ जानेवारी पर्यत अटक करता येणार नाही

मराठी ई-बातम्या टीम केंद्रीय मत्री नारायण राणे यांचे सुपुत्र तथा भाजपाचे आमदार नितेश राणे यांना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *