Breaking News

चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेला इशारा, “पण खूप काही होणार…” स्थायी समिती चेअरमन यशवंत जाधव यांच्या डायरीवरून दिला शिवसेनेला इशारा

मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याकडे आयकर खात्याला कसली डायरी सापडली आणि त्यात कोणत्या मातोश्रींची नोंद आहे, हे मला माहिती नाही. पण मला एवढेच दिसते आहे की, चौकशीतून कोणीही सुटू शकत नाही आणि खूप काही होणार आहे, असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी कोल्हापूर येथे पत्रकारांना सांगितले.

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काहीही आरोप केले तरी केंद्रीय तपासी यंत्रणा स्वायत्त आहेत ही वस्तुस्थिती आहे. या यंत्रणांच्या तपासाची आपल्याला काही माहिती नाही. त्यामुळे इन्कम टॅक्स विभागाला यशवंत जाधव यांच्याकडे कसली डायरी सापडली हे सुद्धा माहिती नाही. मात्र एवढी खात्री आहे की, या चौकशीतून कोणीही सुटू शकणार नाही. खूप काही होणार आहे, हे सुद्धा दिसते आहे अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली.

मातोश्रीचा उल्लेख असलेल्या डायरीची ईडीकडून चौकशी व्हायला हवी या भाजपा आमदार अतुल भातखळकर यांच्या मागणीचे चंद्रकांत पाटील यांनी समर्थन केले.

ते म्हणाले की, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेने उभारलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मारकाच्या उद्घाटनाला केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना निमंत्रित करणे योग्य नाही. या महानगरपालिकेत भाजपाची सत्ता आहे. महानगरपालिकेने बांधलेल्या स्मारकाचे उद्घाटन करण्यास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही निमंत्रित करायला हवे. त्यामुळे भाजपा आ. गोपीचंद पडळकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी केवळ पवारांच्या हस्ते उद्घाटन करण्यास जो विरोध केला आहे तो योग्यच आहे.

सांगलीत भाजपा कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी पक्षपातीपणे निर्बंध लावले आहेत. शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन व्हावे यासाठी त्यांच्या कार्यक्रमाच्या आधीपर्यंतच निर्बंध लावले आहेत. हा पोलीस यंत्रणेचा दुरुपयोग आहे. कोल्हापूरमध्येही असे प्रकार चालू आहेत. आठ आठ वर्षांपूर्वीच्या केसेस काढून कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यात बसवून ठेवले जात आहे. आपला पोलिसांना इशारा आहे की, त्यांनी पक्षपात बंद करावा. हे फार दिवस चालणार नाही. आम्ही पोलीस ठाण्याला घेराव घालू असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या हे भ्रष्टाचाराचे कर्दनकाळ ठरले आहेत. त्यांच्या भीतीने महाविकास आघाडीचे मंत्री आरोप करत आहेत. भारतीय जनता पार्टी पूर्णपणे किरीट सोमय्या यांच्या पाठीशी आहे. शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी केलेल्या टीकेबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, मी सामना वाचायचा बंद केलाय आणि ते जरी बोलले तरी मी त्यांच्या प्रतिक्रियेवर बोलणार नाही.

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी येण्यास भाजपाचे राज्यभरातील नेते – कार्यकर्ते उत्सूक आहेत. भाजपा या मतदारसंघात मतदारांशी थेट संपर्क साधेल आणि विक्रमी मतांनी निवडणूक जिंकेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *