Breaking News

भाजपा, हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना सूडबुद्धीने वागवू नका भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांची मागणी

मुंबईः प्रतिनिधी
अमरावती, नांदेड, मालेगाव या ठिकाणी झालेल्या दंगली राज्यातील सत्तारूढ महाविकास आघाडीच्या आशीर्वादाने झाल्या आहेत. १२ नोव्हेंबर रोजी झालेल्या दंगलीच्या सूत्रधारांना जेरबंद करण्याऐवजी भाजपा तसेच हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर सूडबुद्धीने खटले दाखल केले जात आहेत. प्रशासनाने भाजपा कार्यकर्त्याना खोटया नाट्या गुन्ह्याखाली अडकवणे थांबवावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी बुधवारी केली.
भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत भांडारी बोलत होते. प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष एजाज देशमुख यावेळी उपस्थित होते.
भांडारी यांनी यावेळी राज्यात नुकत्याच झालेल्या धार्मिक दंगली संदर्भात राज्य सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. १२ नोव्हेंबर रोजी अमरावती, नांदेड आणि मालेगाव येथे मोर्चे काढण्यासाठी कोणत्या संघटनांनी स्थानिक प्रशासनाकडे अधिकृत परवानगी मागितली असल्यास त्याबाबतची कागदपत्रे सरकारने जनतेपुढे ठेवावीत, या मोर्चांमध्ये किती संख्येने लोक सहभागी होतील याची माहिती प्रशासनाकडे आली असेल तर तीही प्रसिद्ध करावी तसेच अमरावतीत अटक केलेल्या सर्वांची नावे आणि त्यांचे राष्ट्रीयत्व जाहीर करा, अशा मागण्या त्यांनी यावेळी केल्या.
मालेगाव येथे दंगल प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाला अटक झाली का याची माहितीही सरकारने जाहीर करावी अशी मागणी करत नांदेड येथे अटक केलेला एक दंगलखोर पोलिसांच्या तावडीतून पळाला आहे. अजूनही पोलीस त्याला पकडू शकले नाहीत, असेही त्यांनी सांगितले.
अमरावती येथे इंटरनेट सेवा बंद केल्यामुळे १९ तारखेला होणाऱ्या सीईटी व अन्य परीक्षांचे फॉर्म भरू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली. काश्मीर मध्ये इंटरनेट सेवा बंद असल्याबद्दल आरडाओरडा करणारे महाराष्ट्रातील विचारवंत, बुद्धीमंत, पत्रकार अमरावतीतील नेट सेवा बंद असल्याबाबत मौन पाळून असल्याबद्दल त्यांनी आश्चर्य प्रकट केले.
दंगलीतील नुकसानीबद्दल राज्य सरकारने भरपाई द्यावी
राज्यात अमरावती, नांदेड व मालेगाव या ठिकाणी झालेल्या दंगलीत समाजकंटकांकडून अनेक दुकानांची लुटालूट करण्यात आली. दंगलखोरांना रोखण्यात राज्य सरकारला अपयश आल्याने या नुकसानीची भरपाई राज्य सरकारने त्वरीत द्यावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश व्यापारी आघाडीतर्फे बुधवारी करण्यात आली. व्यापारी आघाडीच्या कार्यकारिणी बैठकीत ही मागणी करण्यात आली. राज्यात नुकत्याच झालेल्या हिंसक घटनांत अनेक व्यापाऱ्यांच्या दुकानांची लुटालूट केली गेली. पोलीस यंत्रणा व स्थानिक प्रशासन व्यापाऱ्यांच्या मालमत्तेचे संरक्षण करण्यात अपयशी ठरल्याने या नुकसानीबद्दल राज्य सरकारने तातडीने भरपाई द्यावी, असे आघाडीने म्हटले आहे.
या बैठकीला आघाडीचे प्रभारी माजी आमदार राज पुरोहित, आघाडीचे प्रदेश संयोजक विनोद कांकाणी, सह संयोजक महेंद्र जैन, जुगलकिशोर जकोटिया, विवेक बनगीनवार, विकास जगताप, हरेश रेलन, सुनील वाघ, श्रीनिवास दायमा आदी उपस्थित होते.

Check Also

मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला, “आभासी उपस्थिती असली तरी पाठिंबा प्रत्यक्षच” निर्भया पथकाच्या धून उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचे विरोधकांवर पलटवार

मराठी ई-बातम्या टीम मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री पदाची दुसऱ्याकडे द्या असा खोचल सल्ला विरोधकांकडून मुख्यमंत्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *