Breaking News

देवेंद्र फडणवीसांचा पलटवार, एजन्सी कुणाचे नातेवाईक बघून कारवाई करत नसते मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या उत्तरावर फडणवीसांचे प्रत्युत्तर

केंद्रीय एजन्सींकडून शिवसेनेच्या आमदारांपाठोपाठ आता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्यावर कारवाई केल्यानंतर विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी भाजपा आणि फडणवीसांवर हल्लाबोल करत माझ्या कुटंबियांची कशाला बदनामी करता, तुम्हाला आरोप करायचेत तर माझ्यावर करा आणि मला अटक करा मी येतो तुमच्यासोबत टाका मला तुरुंगात असे आव्हान दिले.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या या आव्हानावर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देत म्हणाले की, आम्ही इतकी भ्रष्टाचाराची प्रकरणं पुराव्यानिशी मांडली. मुंबई महानगर पालिकेत कोविडच्या काळात कशी लूट झाली, याची उदाहरणं दिली. त्याची कुठलीच उत्तरं सत्ताधाऱ्यांकडे आणि मुख्यमंत्र्यांकडे नव्हती. त्यामुळे त्यांनी भावनिक भाषण केलं. ही त्यांची जबाबदारी आहे की या भ्रष्टाचाराचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे अशी मागणी केली.

तसेच आम्हाला कुणाच्याही कुटुंबापर्यंत जायचे नाहीये. कोणतीही एजन्सी कोण कुणाचे नातेवाईक आहे हे बघून कारवाई करत नसते. तथ्यांच्या आधारावर कारवाई होत असते अशी सारवासारवही त्यांनी यावेळी केली.

न्यायव्यवस्थेवर विश्वास नसल्याचं विधान संजय राऊतांनी काही दिवसांपूर्वी केले होते. त्यावरून देखील फडणवीसांनी राऊतांवर निशाणा साधत म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमर्तींनी महाराष्ट्र सरकारच्या प्रतिनिधींवर नाराजी व्यक्त केली. त्यांची मते कचऱ्याच्या डब्यात टाकतो असे म्हटले. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सामनाची मते कचऱ्याच्या डब्यात टाकली आहेत. अशी मते व्यक्त करून आपल्या लोकशाहीवर, न्यायव्यवस्थेवर विश्वास नसल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे. आपल्या बाजूने निर्णय आला तर उत्तम आणि विरोधात निर्णय गेला तर न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही ही लोकशाहीविरोधी नीती आहे असल्याची टीकाही केली.

Check Also

अतुल लोंढे यांची खोचक टीका, … ४०० पारच्या पोकळ गप्पा मारणा-यांचे २०० चे वांदे

भारतीय जनता पक्षाने ‘अब की बार ४०० पार’चा जो नारा दिला आहे, तो केवळ हवा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *