Breaking News

रावसाहेब दानवेंनी दिला मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना “हा” सल्ला मुख्यमंत्री पदाची जबाबदारी या नेत्यांकडे द्या

मराठी ई-बातम्या टीम

मागील दोन-तीन महिन्यापासून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मानेवरील शस्त्रक्रियेमुळे प्रशासकिय कामकाजातून मुख्यमंत्री हे दूर राहिल्याचे चित्र निर्माण झाले होते. आता आपण पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचा संदेश विरोधकांसह राज्यातील जनतेला देण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी थेट ऑनलाईन बैठक घेत मुंबईकरांसाठी थेट कर सवलतच जाहीर केली. त्यानंतरही भाजपाचे नेते तथा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना एक वेगळाच सल्ला देत मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवा असा खोचक सल्ला शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री असलेल्या उध्दव ठाकरे यांना देत त्यांना एकप्रकारे चिमटाही काढला आहे.

राज्याचा मुख्यमंत्री आजारी असताना शिवसेनेने एकनाथ शिंदे हे सक्षमपणे राज्याचा कारभार हाकू शकतील असा चिमटा काढत ते पण त्यांच्याकडे जबाबदारी सोपविली जात नसल्याचा आरोप दानवे यांनी नाहीतर  राष्ट्रवादीने अजित पवार, काँग्रेसने अशोक चव्हाण यांना जवाबदारी दिली पाहजे असा सल्लाही त्यांनी दिला. ते आजारी असल्याची सांगण्याची गरज नाही. ते लवकर बरे व्हावेत ही आमच्या पक्षाची आणि माझी वैयक्तिक इच्छा आहे. पण त्यांना बरे व्हायला बराच कालावधी लागेल. त्यामुळे विनाप्रमुख राज्य कसे चालेल? राज्यप्रमुख तर नेमावा लागले ना असा उपरोधिक टोलाही त्यांनी यावेळी लगावला.  

यापूर्वीही भाजपाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेमुळे ते फारसे बाहेर पडत नसल्याचे सांगत मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दुसऱ्याकडे सोपवा असे सल्ले दिले होते. आता दानवेंनी थेट एकनाथ शिंदे यांचे नाव पुढे करत सल्ला दिल्याने एका वेगळ्याच चर्चेला सुरुवात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनातही मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीवरून चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला कोपरखिळ्या मारताना दिसून आले, चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्रीपदाचा चार्ज रश्मी ठाकरे यांच्याकडे द्यावा, असा सल्ला दिला होता. तर निलेश राणे यांनी तर मुख्यमंत्री शिंकले तरी घरी बसतात, अशी टीका केली होती. त्यावरून जोरदार घमासान झाल्याचे पहायला मिळाले होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जबाबदाऱ्यांचं वाटप करावे असा सल्ला दिला होता.

या अधिवेशनात आणि अधिवेशनानंतरही विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीचा मुद्दाही चांगलाच गाजला. त्यावरूनही भाजपा महाविकास आघाडीला टोमणे मारायची संधी सोडत नाहीये, अध्यक्ष पदाची निवडणूक व्हावी हे आघाडी सरकारमधील एकाही पक्षाला वाटत नाही. राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस या तिघांना विधानसभेचा अध्यक्ष होऊ द्यायचा नाही, असा टोलाही दानवे यांनीही लगावला.

Check Also

प्रकाश आंबेडकर यांची घोषणा, ….. मी लाचारी मान्य करणार नाही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी युतीच्या सल्ल्यासंदर्भात व्यक्त केल्या भावना

वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तसेच हितचिंतकांनी युतीच्या संदर्भात काय केलं पाहिजे, याविषयी सल्ला दिला. त्यामुळे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *