Breaking News

म्हणून काँग्रेसने कधीच संविधान दिवस साजरा केला नाही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची काँग्रेसवर टीकास्त्र

मराठी ई-बातम्या टीम

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या हयातीत आणि नंतरही अपमानित करण्याचं काम काँग्रेसने सातत्याने केलं. गैरकाँग्रेसी सरकार असतानाच बाबासाहेबांना भारतरत्न देण्यात आला. काँग्रेसची सत्ता असताना त्यांना भारतरत्न दिला गेला नाही. देशातील जनतेला बाबासाहेबांचे काम आणि त्यांची थोरवी कळू नये म्हणून काँग्रेसने कधीच संविधान दिवस साजरा केला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर येताच संविधान दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. जेव्हा जेव्हा आम्ही संविधान दिवस साजरा केला. त्या त्यावेळी काँग्रेसने त्यावर बहिष्कार टाकला असा आरोप केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपा नेते अमित शाह यांनी काँग्रेसवर केला.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाचं संविधान लिहून या देशाला आकार दिला. त्यांनी देशाच्या विकासात मोठं योगदान दिले. मात्र काँग्रेसने त्यांच्या हयातीत आणि नंतरही त्यांचा सातत्याने अपमान केल्याची टीकाही त्यांनी काँग्रेसवर केली.

आज ते पुण्यात शहा यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली.

स्वातंत्र्यानंतर राज्यघटना तयार करण्यात बाबासाहेबांचं मोठं योगदान राहिले आहे. सर्व वादग्रस्त मुद्द्यांवर सर्वांना एकत्र आणण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. दलित वंचितांना राज्यघटनेच्या माध्यमातून संरक्षण देण्याचं काम त्यांनी केले. संपूर्ण आयुष्यभर त्यांनी अपमान सहन केला. कटु अनुभव घेतले. पण राज्य घटनेची निर्मिती करताना त्यांनी कधी त्यात कटुता येऊ दिली नाही. जगभरात आपली राज्यघटना सर्वश्रेष्ठ आहे. सर्वांना समान अधिकार देणारी राज्यघटना आहे हे केवळ बाबासाहेबांमुळेच घडू शकल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

जेव्हा देशात अंधारयुग होतं. आशेचा एक किरणही दिसत नव्हती. स्वराज्य आणि स्वधर्म शब्द उच्चारणंही जेव्हा कठिण होतं. त्या काळात शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा संकल्प केला आणि संपूर्ण आयुष्य स्वराज्यासाठी वेचलं. त्यांच्या या प्रयत्नामुळेच हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील दोन तृतियांश शहरात स्वराज्य मिळवण्याचं सौभाग्य मिळालं, असं त्यांनी सांगितले. शिवाजी महाराजांनी आपल्या अष्टप्रधान मंडळाद्वारे प्रशासनाची पायाभरणी केली. न्याय, नाविक दल, प्रशासकीय काम आदी गोष्टी त्यांनी प्रत्यक्षात उतरवल्याचे त्यांनी सांगितले.

पुण्याच्या विकासासाठी मोदी सरकारने अनेक कामे केली. विमानतळापासून ते मेट्रोपर्यंतच्या कामाला हिरवा कंदिल दिला. पुण्याला लवकरच मेट्रो मिळेल. स्मार्ट सिटीसाठी १०० कोटी दिले. बस सेवा सुधारण्यासाठी केंद्राने एक हजार अतिरिक्त बसेस दिल्या. मुळा मुठा निधी संवर्धनासाठी ११० कोटींचे काम सुरू आहे. सर्वाधिक स्टार्टप पुण्यातच आले आहेत. पुण्याच्या विकाससाठी मोठी सरकार संकल्पबद्ध आहे. आम्ही पुण्याच्या विकासात कोणतीही कसूर ठेवणार नसल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *