Breaking News

गृहमंत्र्यांच्या एसआयटी घोषणेवर किरीट सोमय्या म्हणाले, कितीही एसआयटी नेमा… पत्रा चाळ घोटाळ्यातील संजय राऊत यांच्या सहभागाची चौकशी करा

शिवसेना खा. संजय राऊत यांच्या पत्नीची आणि प्रविण राऊत आणि स्वप्ना पाटकर यांची मालमत्ता ईडीने कारवाई करत जप्त केली. त्यानंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी संजय राऊत यांनी केलेल्या आरोपाची चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आल्याची घोषणा केली. त्यावर भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या म्हणाले की, माझ्या चौकशीसाठी कितीही एसआयटी नेमा, मी घाबरत नाही असे आव्हान राज्य सरकारला दिले.
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मालमत्ता जप्तीच्या कारवाईवर न थांबता अंमलबजावणी संचालनालयाने गोरेगाव येथील पत्रा चाळ घोटाळ्यात खा.राऊत यांच्या सहभागाची संपूर्ण चौकशी करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार डॉ. किरीट सोमय्या यांनी मंगळवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपा प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, अतुल शाह या प्रसंगी उपस्थित होते.
खा.राऊत यांनी ८ महिन्यांपूर्वी अंमलबजावणी संचालनालयाकडे ५५ लाख रु. भरून आपल्या गैरव्यवहाराची अप्रत्यक्ष कबुली दिली होती. आपल्यावर कारवाई होणार या भीतीने हबकलेल्या खा.राऊत यांनी अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांवर आरोप करणे सुरु केले होते. माझ्या कुटुंबियांना तुरुंगात टाकण्याच्या धमक्या दिल्या गेल्या. राज्यसभा अध्यक्षांना पत्र पाठवून अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचे प्रयत्न झाले. मात्र या दबावाला न जुमानता अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी राऊत यांच्या मालमत्ता जप्त करण्याची कारवाई केल्याचे ते म्हणाले.
खा. राऊत यांनी अंमलबजावणी संचालनालयाकडे ५५ लाख रु. भरले तेंव्हाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खा. राऊत यांना जाब विचारायला हवा होता. मात्र तसे न करता ठाकरे सरकारने पोलिसांवर माझ्यावर कारवाई करण्यासाठी दबाव आणला. माझ्याविरुद्ध चौकशीसाठी कितीही एसआयटी नेमा, मी घाबरत नाही, असेही आव्हानही त्यांनी राज्य सरकारला दिला.
काही महिन्यापूर्वी शिवसेना प्रवक्त संजय राऊत यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत ईडी अधिकाऱ्यांकडून मुंबईतल्या बिल्डर लॉबीकडून खंडणी वसूली करण्यात येत असून त्यासाठी किरीट सोमय्या हे ईडी अधिकाऱ्यांना माहिती पुरवित आहेत. तसेच त्यांच्याकडूनच तशी यादी देण्यात येत असल्याचा आरोप केला होता. त्याचबरोबर किरीट सोमय्याच्या मुलांच्या व्यवसायात ईडी अधिकाऱ्यांचा खंडणीतून वसूल केलेला पैसा गुंतविण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला होता.

Check Also

मंत्री तानाजी सावंत म्हणाले, आम्हाला मागील तोटा भरून काढायचाय सोलापूरातील सभेत बोलताना केली घोषणा

शिवसेनेच्या बंडखोर शिंदे गटातील मंत्री तानाजी सावंत यांनी शिंदे-फडणवीस सरकारची स्थापन होऊन ६० दिवस झाले. …

Leave a Reply

Your email address will not be published.