Breaking News

किरिट सोमय्या म्हणाले; परबांनी ती जागा विकली, पण उध्दव ठाकरेंना नोबेल पारितोषिक मिळेल ईडी कारवाईनंतर सोमय्यांची पुन्हा मुख्यमंत्री आणि अनिल परबांवर टीका

ईडीने काल राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या सरकारी आणि खासजी निवासस्थानासह ७ ठिकाणी धाडी टाकत १२ तासाहून अधिक काळ चौकशी केली. त्यानंतर अनिल परब यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ते रिसॉर्ट माझ्या मालकीचे नाही. तसेच चौकशीला आपण सामोरे जाणार असल्याचेही जाहिर केले. त्यानंतर आज भाजपाचे माजी खासदार किरिट सोमय्या यांनी आज सकाळी पुन्हा पत्रकार परिषद घेत अनिल परब आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर टीका करत चोरी, लबाडी, फसवणूक, गुंडगिरी, माफियागिरी केल्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळेल असा टोला लगावला. भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांचा सातबारा कोरा करणार असा इशारा दिला. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी वरील टोला लगावला.

ईडीच्या कारवाईनंतर अनिल परब यांचं वक्तव्य ऐकल्यानंतर ‘तो मी नव्हेच’ या नाटकाची मला आठवण झाली. ‘तो मी नव्हेच’ नाटकासाठी माधव पळशीकरांना अनेक बक्षीसे मिळाली होती. आज जर ते नाटक पुन्हा करायचं ठरलं तर अनिल परब यांना पसंती दिली जाईल. एक माणूस इतका नाटकी बनू शकतो हे उद्धव ठाकरेंनी आपल्याला दाखवून दिले. अनिल परब आपला रिसॉर्टशी काही संबंध नसल्याचं म्हणत आहे. पण मी काढलेल्या १२ मुद्द्यांची उत्तरं का दिली जात नाहीत असा सवालही त्यांनी यावेळी केला.

ईडी अधिकारी कशासाठी आले होते हे मला माहिती नाही, माझा रिसॉर्टशी संबंध नाही असं अनिल परब म्हणतात. १७ डिसेंबर २०२० ची पावती माझ्याकडे आहे. त्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि अनिल परब परिवहनमंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री होते. अनिल परब यांनी २०२०-२१ चा मालमत्ता कर आपल्या खात्यातून भरला होता. तो मी नव्हचे नाट्यकार अनिल परब यांनी याचं उत्तर द्यावे अशी मागणी करत याआधीही अनिल परब यांनी सर्व कर भरले होते. रिसॉर्ट सदानंद कदम यांचा आहे तर तुम्ही का कर भरत होतात असा सवाल त्यांनी केला.

१६ हजार ६८३ स्क्वेअर फिटचं बांधकाम असून घर क्रमांक १०६२ यांच्या मालकीचं आहे. ही संपत्ती अनिल परब यांच्या नावे आहे. याचा बाजारभाव २५ कोटी रुपये आहे. आणि अनिल परब माझा रिसॉर्टशी संबंध नाही सांगतात. अनिल परब आणि उद्धव ठाकरेंना चोरी, लबाडी, फसवणूक, गुंडगिरी, माफियागिरी केल्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळेल, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

सुरुवातीला अनिल परब यांनी स्वतःच्या नावे जमिन असताना त्या जमिनीचा प्रॉपर्टी टॅक्स भरला. तसेच तेथील घरासाठी व्यावसायिक मीटर मिळावे म्हणून वीज मंडळाकडे अर्ज केला. त्यानंतर ती जमिन सदानंद कदम यांना विकली. त्यातून मिळालेला पैसा त्यांनी आपल्या आयकर विवरणात दाखविला नाही. तसेच रिसॉर्ट बांधताना २५ कोटी रूपयांच्या काळ्या पैशाचा वापर करण्यात आला तर ४ कोटी रूपयांचा व्हाईट मनी वापरण्यात आला. यापैशाची नोंदही त्याच्या आयकर नोंदीत करण्यात आली नसल्याचा आरोप सोमय्या यांनी केला.

उद्धव ठाकरेंनी १९ बंगल्यासंबंधी थोतांड नाटक केलं. अनिल परबही त्याच माळेतले मनी आहेत. अहो मुख्यमंत्री किती लबाडी करणार. असा लुच्चा मुख्यमंत्री महाराष्ट्राने आजपर्यंत पाहिलेला नाही. मुख्यमंत्र्यांच्या घरी जाऊन अनिल परब मीडियाला गंडवलं असं सांगतात असा आरोपही त्यांनी केला.

ईडीच्या कारवाईनंतर अनिल परब काय म्हणाले होते?

ईडीने दापोली येथील सदानंद कदम यांच्या मालकीच्या रिसॉर्टमधील सांडपाणी समुद्रात जात असल्याच्या तक्रारीच्या आधारे माझ्या घरांवर आणि माझ्याशी संबंधित व्यक्तींवर कारवाई केली. मुळात त्या रिसॉर्टशी माझा संबंध नाही आणि अद्याप काम पूर्ण होऊन ते रिसॉर्ट सुरूही झालेले नाही. बंद रिसॉर्टचे सांडपाणी समुद्रात कसे जाईल व त्यागोष्टीचा पैशांच्या गैरव्यवहाराशी काय संबंध, असा सवाल करत शिवसेना नेते व परिवहनमंत्री अनिल परब यांनी ईडीच्या कारवाईला हास्यास्पद ठरवले. पण कोणत्याही चौकशीला कायम सहकार्य राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

 

Check Also

गडकरींकडून आदर्श आचारसंहितेचा भंग, गडकरी व आमदार मोहन मतेंवर गुन्हा नोंदवा

भारतीय जनता पक्ष सर्वकायदे धाब्यावर बसवून सातत्याने आचारसंहितेचा भंग करत आहे. भारतीय जनता पक्षाचे नागपूर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *