Breaking News

शिवसेना नेते दानवे म्हणाले, काही जणांना दुर्बुध्दी… एकनाथ शिंदे गटावर केली टीका

दिलेला शब्द पाळला नसल्याच्या कारणावरून भाजपा आणि शिवसेनेत वितुष्ट आले. त्यानंतर या दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडण्यात येत होत्या. त्यातच आता शिवसेनेतील एकनाथ शिंदे गटाला वेगळे करत भाजपाने राज्यात सत्ता स्थापन केली. त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांकडून भाजपाबरोबरच एकनाथ शिंदे गटावरही सातत्याने टीका करण्यात येत आहे. शिंदे गटावर कधी गद्दार तर पाठीत खंजीर खुपसणारे असे आरोप शिवसेनेकडून करण्यात येत आहे. त्यातच आज शिवसेनेचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटावर टीका करत काही जणांच्या मनात दुर्बुध्दी आल्याने बाजूला सारलं गेल्याची उपरोधिक टीका केली.

शिवसेना आमदार आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्यांच्या घरी बाप्पांची प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर माध्यमांशी बोलताना शिंदे गटावर टीकास्त्र सोडलं.

अंबादास दानवेंनी आज त्यांच्याघरी सहकुटुंब गणरायाची प्राणप्रतिष्ठा केली. यानंतर माध्यमांनी गणरायाला काय साकडं घातलं? यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी शिंदे गटावर टीकास्त्र सोडलं. तसेच, पुन्हा महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात हिंदुत्वाचा झंजावात यावा, अशी अपेक्षा देखील व्यक्त केली.

न्यायालयाच्या निकालाविषयी मी बोलणं संयुक्तिक राहणार नाही. काल-परवा एक नेते त्यावर बोलले आहेत. पण नक्कीच आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे, असं अंबादास दानवे यावेळी म्हणाले.

उद्धव ठाकरेंसारखं एक सालस आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारं नेतृत्व राज्याला लाभलं होतं. काही लोकांच्या मनात दुर्बुद्धी आल्यामुळे बाजूला सारलं गेलंय असा टोलाही त्यांनी यावेळी शिंदे गटाला लगावला.

उद्धव ठाकरेंसमोर मुख्यमंत्रीपदाची खुर्ची म्हणजे छोटी खुर्ची आहे. उद्धव ठाकरेंचं नेतृत्व फक्त महाराष्ट्र नाही, तर देशाच्या वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करणारं नेतृत्व आहे. त्यामुळे येत्या काळात त्यांच्याच नेतृत्वाखाली पुन्हा एकदा महाराष्ट्रात आणि देशातही हिंदुत्वाचा झंजावात येऊ दे अशी प्रार्थना मी गणरायाला केली असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *