Breaking News

छगन भुजबळ यांचा टोला, …किमान उंची बघुन तरी डोकं आपटा नवीन व्याख्येप्रमाणे गणपती बाप्पा विघ्नहर्ता नाही

भाजपा आणि शिंदे गटाकडून सातत्याने ठाकरे सरकारने सणांवर निर्बंध लादल्याचा आणि शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर गणेशोत्सवावरील सर्व निर्बंध काढल्याच्या जाहिराती भाजपा आणि शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. मुंबईत अनेक ठिकाणी ‘हिंदूंचा सण निर्बंधमुक्त’ अशी बॅनरबाजीही झाली. यावरून भाजपा-शिंदे गट आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरु झालेले असताना आता त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार छगन भुजबळ यांनी उडी घेत शिंदे-फडणवीस सरकारला या मुद्द्यांवरून टोला लगावला आहे.

आज शुक्रवारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले, नक्की गणेश दर्शन सुरु आहे की दर्शना आडून निवडणूकीचा प्रचार सुरु आहे असा खोचक सवाल करत नवीन व्याख्येप्रमाणे गणपती बाप्पा विघ्नहर्ता नाही, असा टोलाही शिंदे-फडणवीस सरकारला लगावला.

गणपती बाप्पांनी सत्तेत असणाऱ्यांना सुबुद्धी द्यावी. सरकारने घोषणांच्या पलिकडे जाऊन लवकरात लवकर निर्णय घेऊन लोकांचे प्रश्न सोडवावेत. नवीन व्याख्येप्रमाणे गणपती बाप्पा विघ्नहर्ता नाही. हे नवं सरकारच विघ्नहर्ता आहे अशी त्यांनी जाहिरात केली आहे. ते म्हणतात त्यांचं सरकार आलं आणि हिंदू सणांवरील विघ्न कमी झालं. त्यामुळे या विघ्नहर्तापेक्षा तेच विघ्नहर्ता झाले आहेत असा खोचक टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

आज राज्यात अनेक विघ्न आहेत. ही विघ्न या सरकारने दूर करावीत. बेरोजगारी, महागाई अशा अनेक अडचणी आहेत. शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत. मुसळधार पाऊस पडतो आहे. हेही विघ्न या सरकारने दूर करावीत, असा टोलाही त्यांनी लगावला.

भाजपाने बारामतीच्या नादाला लागू नये. हे दगडावर डोकं आपटण्यासारखं आहे. वेळेची आणि उर्जेचा अपव्यय आहे. त्यांनी तेवढा वेळ आणि शक्ती दुसरीकडे कुठेतरी लावावी. भलत्या-सलत्या ठिकाणी कुठं जात आहात असा खोचक सवालही त्यांनी यावेळी  भाजपाला करत तुमची उंची किती आहे, त्यांची उंची किती आहे काही तरी विचार करा. मग त्यावर डोकं आपटा, असा खोचक सल्लाही त्यांनी भाजपाला दिला.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने मुंबईत १५० चा नारा दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गणपती मंडळांना भेटीचा सपाटा लावला आहे. याबाबत विचारलं असता छगन भुजबळ म्हणाले, आता उत्सवांमध्येही प्रचाराचे नारळ फोडले जात आहेत. नक्की गणेशदर्शन सुरू आहे की निवडणुकीचा प्रचार सुरू आहे हे लोकांच्या लक्षात येत आहे.

Check Also

अमित शाह यांची घोषणा, सत्तेवर येताच संपूर्ण देशात समान नागरी कायदा

संपूर्ण देशात समान नागरी कायदा, एकाच वेळी लोकसभा-विधानसभा निवडणुका, ७० वर्षावरील प्रत्येक नागरीकास पाच लाखापर्यंत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *