Breaking News

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाचा सेवा पंधरवडा प्रदेशाध्यक्ष चंद्रेशखर बावनकुळे यांची माहिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस भारतीय जनता पार्टी सेवा करून साजरा करणार असून त्या निमित्ताने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर भाजपाचा सेवा पंधरवडा हा उपक्रम असेल, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी नागपूर येथे दिली. या कालावधीत स्वच्छता, आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, दिव्यांगांना मदत, मोदी सरकारच्या कामाची माहिती देणारी प्रदर्शने, वैचारिक चर्चा असे विविध उपक्रम होणार असून त्यामध्ये पक्षाचे सर्व पदाधिकारी, मंत्री, खासदार, आमदार असे सर्वजण सक्रीय सहभागी होणार आहेत, असे ते म्हणाले.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस १७ सप्टेंबर रोजी आहे. भाजपाचे सर्व कार्यकर्ते त्यांचा वाढदिवस सेवेच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून ‘सेवा पंधरवडा’ म्हणून साजरा करतात आणि त्यांना दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभो अशी प्रार्थना करतात. भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या सूचनेनुसार पक्षातर्फे यंदा देशभर सेवा पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे.

ते म्हणाले की, सेवा पंधरवड्यात विविध प्रकारचे उपक्रम होणार आहेत. आरोग्यविषयक उपक्रमांमध्ये स्वच्छता, रक्तदान, विनामूल्य आरोग्य तपासणी, दिव्यांगांना कृत्रिम अवयव व उपकरणे देणे, टीबी झालेल्यांना मदत करणे आणि कोरोना लसीकरणाचा बूस्टर डोस घेण्यास नागरिकांना मदत करणे यांचा समावेश आहे.

त्यांनी सांगितले की, पर्यावरणाच्या रक्षणाची जाणीव होण्यासाठी वृक्षारोपण कार्यक्रम आणि जलाशयांचे स्वच्छता अभियान राबविण्यात येईल. कार्यकर्ते घरोघर जाऊन जल संरक्षणाचा संदेश पोहोचवतील.

ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या कामाचा केंद्रबिंदू सामान्य माणूस आहे. त्यांच्या योजनांचा सर्वसामान्य लोकांना लाभ झाला आहे. अशा लाभार्थींशी संपर्क साधून कार्यकर्ते त्यांना पंतप्रधानांना पत्रे पाठविण्यासाठी आवाहन करतील. पंतप्रधानांच्या जनकल्याणकारी धोरणांची व कार्यक्रमांची होर्डिंग व बॅनर लावण्यात येतील. तसेच याविषयी सोशल मीडियावरून जनजागृती अभियान राबविण्यात येईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने २०१४ पासून देशात परिवर्तन करणारे कार्य केले आहे. त्यांचे व्यक्तिमत्व आणि कार्य याची चर्चा करणारी वैचारिक संमेलने या पंधरवड्यात पक्षातर्फे आयोजित करण्यात येतील. पंतप्रधान व त्यांच्या सरकारविषयी विविध वृत्तपत्रांमध्ये पक्षाचे मान्यवर नेते लेख लिहितील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जीवन व कार्य याविषयी पक्षातर्फे ठिकठिकाणी प्रदर्शने आयोजित करण्यात येतील. तसेच त्यांच्या विषयीच्या पुस्तकांची माहिती देऊन ती उपलब्ध केली जातील, अशी माहितीही त्यांनी दिली.

ते म्हणाले की, देशाच्या एकात्मतेची भावना दृढ होण्यासाठी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी एक दिवस अन्य राज्याप्रमाणे आहार, भाषा अशा सांस्कृतिक वारशाचा अनुभव घेण्याचा अनोखा उपक्रम या पंधरवड्यात करण्यात येईल. तसेच स्थानिक उत्पादनांची खरेदी आणि व्यवसायांना चालना मिळण्यासाठी भाजपा कार्यकर्ते पुढाकार घेतील.

सेवा पंधरवड्याच्या कालावधीत भाजपा कार्यकर्ते २५ सप्टेंबर रोजी भाजपाचे वैचारिक प्रेरणास्थान पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी करतील. तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती २ ऑक्टोबर रोजी साजरी करण्यात येईल. या कालावधीत भाजपा कार्यकर्ते खादी खरेदी करतील, अशी माहिती त्यांनी दिली.

सेवा पंधरवड्यासाठी पक्ष संघटनेमध्ये सर्व रचना व नियोजन पूर्ण झाले असून कार्यकर्ते हा उपक्रम यशस्वी करतील, असे त्यांनी सांगितले.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *