Breaking News

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका,… शरद पवारांना दिशाभूल करण्याची सवय छत्रपती शिवाजी महाराजांशी राहुल गांधींची तुलना, काँग्रेसने देशाची माफी मागावी

राहुल गांधींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्याबद्दल काँग्रेसने तातडीने देशाची माफी मागावी अन्यथा आंदोलन करू असा इशारा भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी दिला. भाजपा प्रदेश कार्यालयात ते पत्रकारांशी बोलत होते. भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी, चैनसुख संचेती , प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यावेळी उपस्थित होते. नवाब मलिक यांच्या अटकेबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महाराष्ट्राची दिशाभूल करू नये, असेही बावनकुळे यांनी सांगितले.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, काँग्रेस पक्षाकडून प्रसारीत केल्या गेलेल्या एका व्हिडिओमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करण्यात आली आहे. या प्रकाराबद्दल काँग्रेसने तातडीने देशाची माफी मागावी, अन्यथा भारतीय जनता पार्टी याविरोधात आंदोलन करेल.

पुढे बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, मुंबईत बॉम्बस्फोट घडविणाऱ्या देशद्रोही दाऊद इब्राहिम टोळीशी संबंध असल्याच्या आरोपावरून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे. समीर वानखेडे यांच्यावर केलेल्या आरोपांचा आणि नवाब मलिक यांच्या अटकेचा काहीच संबंध नाही. मात्र शरद पवार यांना जनतेची दिशाभूल करण्याची सवय आहे. या सवयीतूनच पवार यांनी नवाब मलिक यांच्या अटकेबाबत चुकीची माहिती दिली आहे. पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने जनतेत या पद्धतीने संभ्रम पसरवू नये असे स्पष्ट केले.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भारतीय जनता पार्टीने प्रवेशाचे निमंत्रण दिलेले नाही, अजित पवारांनीही भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केलेली नाही. असे असताना अजित पवार राष्ट्रवादी सोडणार असल्याच्या बातम्या वारंवार पसरवल्या जात आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडूनच अजित पवारांची बदनामी केली जात आहे, असेही बावनकुळे यांनी सांगितले.

बावनकुळे यांनी सांगितले की, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना न्यायालयाने प्रकृतीच्या कारणास्तव जामीन मंजूर केला आहे. देशमुखांवरील आरोपांची सुनावणी न्यायालयात अजून सुरु असताना खुद्द अनिल देशमुख न्यायालयाबाबत मतप्रदर्शन करीत असल्याने न्यायालयाचा अवमान होत आहे. देशमुख यांनी या बाबत जाहीर वक्तव्ये न थांबविल्यास न्यायालयाकडे त्यांची तक्रार करू, असेही ते म्हणाले.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *