पुण्यात सात महिन्याच्या गर्भवती महिलेचा दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या मुजोरपणामुळे बळी गेला, ही घटना ह्रदय पिळवटून टाकणारी आहे. जनतेत मंगेशकर रुग्णालयाच्या मुजोरीपणा विरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पण ना सरकार ना पोलीस प्रशासन कोणीही योग्य ती कारवाई केलेली नाही. या मातेचा मृत्यू दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणा व मुजोरपणाचा बळी असून संबंधित डॉक्टर व रुग्णालयावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली.
यासंदर्भात संताप व्यक्त करत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले की, पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालय हे धर्मादाय नोंदणी असलेले रुग्णालय आहे, जनतेच्या कराच्या पैशातून ते उभे राहिले आहे, सरकारने या रुग्णालयाला एक रुपयाने जमीन दिली आहे. पण या रुग्णालयात सामान्य लोकांना लुटण्याचे काम होत आहे. मयत तनिषा भिसे यांच्या नातेवाईकांना रुग्णालयाने २० लाख रुपयांचा खर्च येईल व १० लाख रुपये आधी भरा असे सांगितल्याचे समजते. २० लाख रुपये एवढी मोठी रक्कम मध्यमवर्गीय कुटुंबालाही परवडणारी नाही. पैशासाठी या रुग्णालयाने एका मातेचा बळी घेतला आहे, दोन बाळं आईच्या प्रेमाला व दुधाला मुकली आहेत, हे अत्यंत गंभीर असल्याची टीकाही यावेळी केली.
अतुल लोंढे पुढे बोलताना म्हणाले की, या प्रकरणाची अंतर्गत चौकशी करण्याचा कांगावा रुग्णालय प्रशासन करत आहे, त्यातून काहीच निष्पन्न होणार नाही. अशा मुजोर रुग्णालयावर कठोर कारवाई झाली पाहिजे जेणेकरून पुन्हा कोणते बाळ आईच्या मायेला पोरके होणार नाही, अशी कडक कारवाई करण्याची धमक देवेंद्र फडणवीस सरकारने दाखवावी, असे आव्हानही यावेळी दिले.
