Breaking News

अजित पवार यांचा निशाणा, काय सांगताय तोंड वर करून? शिंदे-फडणवीस सरकारवर साधला निशाणा

वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर जाण्याला महाविकास आघाडी सरकार जबाबदार असल्याचा आरोप करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना यावेळी अजित पवारांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं. १५ जुलै रोजी नव्या सरकारच्या काळात झालेल्या बैठकीत या प्रकल्पावर सविस्तर चर्चा झाली होती, असं सांगताना अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करताना म्हणाले, आता म्हणतात मागच्या सरकारनं केलं. अरे मागच्या सरकारनं केलं हे काय सांगताय तोंड वर करून? १५ जुलैची मीटिंग झाल्याचं समोर आहे. काहीही बोलता काय? खोक्यानं जमलं म्हणजे सगळंच जमत नसतं. महाराष्ट्रातल्या तरुणांनी तर पेटून उठलं पाहिजे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले.

बीडमध्ये आयोजित पक्षाच्या युवक मेळाव्यात बोलताना अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला.

अतीवृष्टीमुळे राज्यात मोठं नुकसान झालं आहे. तिथल्या शेतकऱ्याला पीकविम्याचे पैसे मिळत नाहीत. त्याचं उत्तर देत नाहीत. त्याचं उत्तर द्या ना. सत्तेची मस्ती, नशा आणि धुंदी उतरवण्याची ताकद महाराष्ट्राच्या मतदारांमध्ये आहे हे या सरकारनं लक्षात घ्यावं. आम्हीही लक्षात ठेवतो. आम्हीही काही ताम्रपट घेऊन जन्माला आलेलो नाही. पण काय पद्धतीचं राजकारण सुरू आहे. तु्म्ही सांगितलं होतं लगेच पैसे देतो. दिले का पैसे? असा सवाल त्यांनी यावेळी केला.

सत्ताधारी आमदारांकडून केल्या जात असलेल्या विधानांचा यावेळी त्यांनी समाचार घेतला. गेल्या तीन महिन्यांत कायदा-सुव्यवस्था ढासळली आहे. सत्ताधारी पक्षाचेच आमदार मुंबईत गोळीबार करत आहेत. सरकारमधले आमदारच गोळीबार करत असतील तर जनतेनं न्याय मागायचा कुणाकडे? हे तर आक्रितच झालं, असंही ते म्हणाले.

कोण चुकीचं वागत असेल, तर त्यांना शासन केलं गेलं पाहिजे. पण तसं होत नाही. गोळीबार केला जातो. त्यांचे लोक शिवीगाळ करतात. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का? काही तर आमदार हात-पाय तोडण्याची भाषा करतात. त्यांच्या मेळाव्यात आमदारानं सांगितलं विरोधकांचे हात-पाय तोडा. कुणी तुमच्यामागे आलं तर मी उभा आहे. अरे काय तुझ्या बापाच्या घरचं आहे का? हे तुम्ही कसं बोलू शकता? असा परखड सवालही अजित पवार यांनी यावेळी करतइतर राज्यांमध्ये तशा घटना घडतात. पण महाराष्ट्राला त्या पातळीवर न्यायचंय का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थितांना केला.

काही आमदार म्हणतात गिन गिन के, चुन चुन के मारेंगे.. कोण कुणाला मारतंय, कोण कुणाला काय करतंय आणि बाकीच्यांनी काय बांगड्या भरल्यात का? गिनता तरी येतं का? असा खोचक सवालही त्यांनी केला.

Check Also

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, कोल्हापूरकरांची पूर चिंता कायमची मिटणार

अतिवृष्टीमुळे कोल्हापूरात येणाऱ्या महापुराबाबत कायमस्वरुपी तोडगा काढणारा ३५०० कोटींचा कृती आराखडा राज्य सरकारने मंजुर केला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *