राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी काही लोकांनी हल्ला केला, चपला फेकल्या व शरद पवार यांच्या नावाने अश्लाघ्य भाषेत घोषणा दिल्या. हा प्रकार अत्यंत निषेधार्ह आहे, या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करून आंदोलकांना चिथवाणी देणारे कोण आहेत? त्याचा शोध घेऊन कडक कारवाई करा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
यासंदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे ही काँग्रेस पक्षाची भूमिका राहिली आहे. सरकारनेही त्यांच्या मागण्या मान्य केल्या, काल न्यायालयानेही एसटी संपावर निर्णय दिला तो निर्णयही सर्वांना मान्य आहे. परंतु आज अचानक एक मोठा जमाव शरद पवार यांच्या घरावर चाल करुन जातो हा नियोजनबद्धरितीने केलेला हल्ला दिसत आहे. या आंदोलकांना कोणीतरी शिकवून पाठवलेले असावे. या आंदोलकांना भडकावणारा कोण आहे? या प्रकारामागे जो कोणी असेल त्याचा शोध घेऊन कडक कारवाई करावी अशी मागणी केली.
आजही आम्ही सर्वजण एसटी कामगारांच्या पाठीमागे आहोत. त्यांना न्याय मिळालाच पाहिजे पण अशा प्रकारे एखाद्या जेष्ठ नेत्याच्या घरावर हल्ला करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. काही मतभेद असतील, त्यांच्या काही मागण्या असतील तर चर्चेतून मार्ग निघू शकतो. अशा पद्धतीने महाराष्ट्राचे वातावरण बिघडवण्याचा जे कोणी प्रयत्न करत आहेत त्यांना कायद्याच्या चौकटीत जरब बसेल अशी कठोर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
दरम्यान, काल मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांचे वकील अॅड. गुणरत्न सदावर्ते याच्यासह मोठा उस्तव साजरा केला. तसेच गुलाल, नीळ उधळून मोठा जल्लोषही साजरा केला. मात्र प्रसारमाध्यमांशी बोलताना सदावर्ते यांनी संपूर्ण निकाल आल्यानंतर पुढील दिशा ठरविणार असल्याचे सांगितले. त्यावर प्रसारमाध्यमांनी प्रश्न केला की, जर पूर्ण निकाल हाती आल्यानंतर जर पुढील दिशा ठरविणार असाल तर मग ही गुलाल, निळ्या रंगाची उधळण कशासाठी ? असा सवाल केला. मात्र त्यास उत्तर देण्याचे सदावर्ते यांनी टाळले.
त्यानंतर आज संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवारांच्या घरावर चपला आणि दगडफेक करत आपला संताप व्यक्त केला. त्यामुळे राज्यातील परिस्थिती तणावपूर्ण बनली. परंतु वेळीच पोलिसांची कुमक पवारांच्या निवास्थानी पोहोचल्याने परिस्थिती नियंत्रणात राहीली. त्यानंतर पोलिसांनी संतप्त कार्यकर्त्यांना पवारांच्या निवासस्थानाहून अन्यत्र नेले.
