Breaking News

ऐन शेवटच्या घटकेला काँग्रेसने उमेदवार बदलला काँग्रेसकडून उशीराने उमेदवार बदलाची घोषणा

मराठी ई-बातम्या टीम
राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास शिल्लक राहिलेले असताना, एक मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेसने ऐनवेळी आपला उमेदवार बदलला असून, आता छोटू भोयर यांच्या ऐवजी अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांनी पाठिंबा जाहीर केल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे काँग्रेसने तसे पत्रक देखील काढल आहे. तर, विधान परिषदेचे अगोदरचे उमेदवार भोयर यांना मात्र या निर्णयाबद्दल काहीच कल्पना नव्हती, अशी देखील माहिती समोर आली आहे.
काँग्रेसकडून उमेदवार बदलला जाणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. त्यानंतर काँग्रेसने आता प्रत्यक्ष तसा निर्णय घेतल्याचं समोर आले आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकीत सहापैकी चार मतदारसंघात निवडणूक बिनविरोध झाली. विदर्भातील अकोला व नागपूर या ठिकाणी मात्र महाविकास आघाडी विरुद्ध भाजप यांच्यात सामना रंगणार आहे.
नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने पक्षातर्फे डॉ. रविंद्र भोयर यांना उमेदवारी जाहीर केली होती. या निवडणुकीसाठी उद्या १० डिसेंबर रोजी मतदान होत आहे. मात्र, आता निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात डॉ. रविंद्र भोयर यांनी ही निवडणूक लढवण्यासाठी असमर्थता दर्शविल्याचे समजते. त्यामुळे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मान्यतेने तसेच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार या निवडणुकीतील अपक्ष उमेदवार मंगेश सुधाकर देशमुख यांना काँग्रेस पक्षाकडून पाठिंबा जाहीर करण्यात येत आहे. तरी या निवडणुकीतील मतदान करणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या सर्व सदस्यांना तसेच महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना या संदर्भात माहिती देण्यात यावी, अशी सूचना काँग्रेसकडून काढण्यात आलेल्या पत्रकात देण्यात आली आहे.
काँग्रेसच्या या अचानक उमेदवार बदलामुळे नागपूरात भाजपाचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांचा विजय निश्चित मानला जात आहे. ऐनवेळच्या या राजकिय घडामोडींमुळे काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांमध्ये आणि त्याच्या मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Check Also

‘राष्ट्रासाठी राष्ट्रवादी’ या संकल्पनेवर आधारित राष्ट्रवादीचा जाहिरनामा…

राज्यातील सर्व समाजघटकांना… अठरापगड जाती आणि बारा बलुतेदार यांचा विचार करणारा आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *