Breaking News

शेलारांचा सवाल, महाराष्‍ट्रातील तरूणांना केवळ वडापाव विकायला सांगणार आहात काय? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भेटीवरून भाजपाची टीका

मुंबई: प्रतिनिधी

महाराष्‍ट्र दौ-यावर असणा-या पश्‍चि‍म बंगालच्‍या मुख्‍यमंत्री ममता बॅनर्जी आणि महाराष्‍ट्राचे मुख्‍यमंत्र्यांच्‍यावतीने त्‍यांची भेट घेणारे मंत्री आदित्‍य ठाकरे यांच्‍यात झालेल्‍या बैठकीची अधिकृत माहिती महाराष्‍ट्र शासनाने जाहीर करावी. हे एक कटकारस्‍थान असून इथले उद्योग पश्चिम बंगालमध्‍ये घेऊन जाण्‍यास सत्‍ताधारी शिवसेना मदत तर करीत नाही ना? असा सवाल भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांनी आज केला.

पश्‍चि‍म बंगालच्‍या मुख्‍यमंत्री ममता बॅनर्जी यांचे काल मुंबईत आगमन झाल्‍यानंतर महाराष्‍ट्राचे पर्यावरण आणि राजशिष्‍टाचार मंत्री आदित्‍य ठाकरे यांनी भेट घेतली. मुख्‍यमंत्र्यांच्‍यावतीने ही भेट आपण घेतल्‍याचे आदित्‍य ठाकरे यांनी जाहीर केले. त्‍यामुळे या भेटीबाबत भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांनी माध्‍यम प्रतिनिधींशी बोलताना या भेटीबाबत काही गंभीर प्रश्‍न उपस्थित केले आहेत. या गुप्त बैठकीमध्‍ये कट कारस्‍थान तर नाही ना? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

ममता दीदी यांचे महाराष्‍ट्रात सरकारी पक्षांनी स्‍वागत केले ते प्रथेप्रमाणे अपेक्षितच आहे. पण त्‍यानंतर मंत्री आदित्‍य ठाकरे यांनी घेतलेली भेट व त्‍यांची झालेली बैठक कशासाठी होती? महाराष्‍ट्रात कोणीही आले की आमचा कौटुंबिक स्‍नेह असल्‍याचे सांगून या भेटी घेतल्‍या जातात. तुमचा कौटुंबिक स्‍नेह असेलही आम्‍हाला त्‍याबद्दल काय करायचे आहे पण महाराष्‍ट्राचा त्‍याच्‍याशी काय सबंध? बांग्‍लादेशीयांना संरक्षण देणा-या ममतादिदी यांच्‍याशी कुठले आले कौटुंबिक संबध? असा सवालही त्‍यांनी केला.

ममतादिदी महाराष्‍ट्रातील उद्योगांना आपल्‍या राज्‍यात यायचे आमंत्रण देण्‍यासाठी आल्‍या आहेत. देशभर सर्वत्र उद्योग धंद्ये असले पाहिजे हीच भाजपाची भूमिका आहे. मात्र आपल्‍या राज्‍यातील उद्योग तुम्‍ही घेऊन जा, असे महाराष्‍ट्रातील सत्‍ताधारी शिवसेना दिदींना सांगते आहे काय? हा प्रश्‍न आहे. महाराष्‍ट्रातील रोजगार, व्‍यवसाय, इंडस्ट्रीज इथून घेऊन जाण्‍यास सत्‍ताधारी शिवसेना ममतादिदींना मदत करते आहे काय? महाराष्‍ट्रात काँग्रेसला ना स्‍थान, ना इज्‍जत, ना किंमत, ना स्‍थान, ना स्थिती त्‍यामुळे कॉंग्रेसला काय ते त्‍यांचे त्‍यांनी ठरवावे. आमचा सवाल महाराष्‍ट्राचा आहे. महाराष्‍ट्रातील उद्योग पश्चिम बंगालला पाठवून महाराष्‍ट्रातील तरूणांना केवळ वडापाव विकायला सांगणार आहात काय?

तसेच नुकतीच भिवंडीत बांग्‍लादेशींयावर कारवाई झाली अशा कारवाया पुन्‍हा करू नका म्‍हणून सत्‍ताधारी शिवसेनेने ममतादिदींना शब्‍द तर दिला नाही ना? पश्चिम बंगालमध्‍ये विरोधकांच्‍या ज्‍या हिंसा केल्‍या जात आहेत त्‍याचे धडे तर गिरवले जात नाही ना? असे प्रश्‍न उपस्थित करून आमदार अॅड आशिष शेलार यांनी या बैठकीचे अधिकृत माहिती आणि इतिवृत्‍त जाहीर करा, अशी मागणी केली आहे.

सिध्‍दीविनायकाकडे कोणी कुणासाठी काय मागावे हा ज्‍याचा त्‍याचा प्रश्‍न आहे. पण केंद्रीय स्‍थरावर भाजपाच्‍या विरोधात संघर्ष करण्‍यासाठी ज्‍यांना यायचे आहे त्‍यांचे कंडू शमन होईलच. एकदा आपापसात नेतृत्‍व कोण करणार ते तर ठरवा, असा प्रतिसवालही त्‍यांनी या बाब‍त प्रश्‍नांवर बोलताना केला.

आम्‍हाला जय हिंदू राष्‍ट्र हे मान्‍य आहे, ते ममतादिदींना मान्‍य आहे का? ते मान्‍य नसेल तर ते शिवसेनेला मान्‍य आहे का? असा सवाल करत ममता दिदींच्‍या जय बांगला जय मराठा या घोषणेबाबत केला.

हिंसेच्‍या घटनांनी पश्चिम बंगालमधील जनता त्रस्‍त आहे. आता हे दोघे मिळून बंगाल आणि महाराष्‍ट्र अस्थिर करण्‍याचा प्रयत्‍न करीत आहेत. तुमच्‍याकडे आलेल्‍या टाटांना तुम्‍ही अपमानीत करून पाठवलेत. उद्योग जगतात ज्‍यांचे आदराने नाव घेतले जाते त्‍या मुंबईकर टाटांचा ज्‍यांनी अपमान केला त्‍यांना शिवसेना महाराष्‍ट्रात पायघड्या घालते? आणि आम्‍हाला मग महाराष्‍ट्र धर्म तुम्‍ही शिकवता? असा सवाल करत म्‍हणून या बैठकीमागे कट कारस्‍थान आहे. ते हिंसाचाराचे आहे, रोजगार पळवण्‍याचे आहे, कारखाने पळवण्‍याचे आहे. दहशत पसरवण्‍याचे आहे का ? असा खोचक सवालही त्यांनी केला.

पश्चिम बंगालमधून सर्व लांडग्‍यांना वाघिणीने पळवून लावले असे विधान खा. संजय राऊत यांनी केले होते. त्‍यावर पत्रकारांनी प्रश्‍न विचारला असता आमदार अॅड आशिष शेलार म्‍हणाले की, त्रि‍पुरात जाऊन संजय राऊत यांनी प्रचार करावा, त्रि‍पुरातून तुमच्‍या वाघिणीचे मांजर करून जनतेने पळून का लावले? असा उपरोधिक सवालही त्यांनी राऊत यांना केला.

Check Also

जयराम रमेश यांचे भाकित, मतदानाचे संकेत स्पष्ट, मोदी सरकारला निरोप…

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील १०२ जागांवर झालेले मतदान हे भाजपा व नरेंद्र मोदी सरकारचे शेवटचे दिवस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *