Breaking News

बाळासाहेब थोरात यांचा इशारा, जोडे जसे तुमच्याकडे तसेच आमच्याकडेही, विसरू नका तुमच्या काळात नव्या पायंड्याला सुरुवात करताय म्हणत विरोधकांचा सभात्याग

विधानसभेच्या नियमित कामकाजाला सुरुवात होताच विधिमंडळ परिसरात आमदारांसाठी असलेल्या आचारसंहितेचे उल्लंघन कऱणारे कृत्य राहुल गांधी यांच्या त्या वक्तव्याच्या निषेधार्थ सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी जोडे मारो आंदोलन केले. त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधान परिषदेच्या पीठासीन अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यानुसार कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याची आठवण महाविकास आघाडीच्या सदस्यांनी करून दिली. त्यानंतरही विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रश्नोत्तराचा तास सुरु ठेवत विरोधकांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले.

त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांनी आक्रमक पवित्रा घेत आम्हाला बोलू द्या अशी मागणी करायला सुरुवात केली.

त्यावर विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काँग्रेस विधिमंडळाचे गटनेते बाळासाहेब थोरात यांना बोलण्याची संधी दिली. त्यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, सभागृहाच्या आवारात राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन करताना आमचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन केले. त्या आंदोलनात सत्ताधारी पक्षाचे काही आमदार विधान परिषदेचे असल्याने तेथील पीठासीन अधिकाऱ्यांशी चर्चा करून अधिवेशाच्या शेवटच्या दिवशी सकाळी निर्णय देणार असल्याच्या आश्वासनाची आठवण करून दिली. त्यानुसार आता यासंदर्भातील निर्णय झाला त्याची माहिती द्यावी अशी मागणी केली.

पुढे बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले, तुमचेही राष्ट्रीय नेते आहेत. आमचेही राष्ट्रीय नेते आहेत. आतापर्यंत सरकारच्या धोरण विरोधात विधिमंडळाच्या पायऱ्यावर उभे राहुन आंदोलन केले. ते आंदोलन कधी तुम्ही केले आता आम्हीही करत आहोत. मात्र तुमच्या काळात तुम्ही नवे पायंडे पाडत असून इथून पुढे पडणाऱ्या नव्या पायंड्याला तुम्ही जबाबदार असाल असे सांगत जसे तुमचे जोडे आहेत तसे आमचेही जोडे आहेत हे विसरू नका असा इशारा दिला.

तसेच याप्रकरणात आम्हाला आताच निर्णय द्यावी अशी मागणी थोरात यांनी विधानसभाध्यक्षांकडे केली. तसेच याप्रकरणात आमचे महाविकास आघाडीचे सदस्य असतील तर त्यांच्यावरही कारवाई करा. पण राहुल गांधी यांच्या विरोधात ज्या सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी जोडे मारो आंदोलन केले त्यांच्यावरही कारवाई करावी अशी मागणी केली.

त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी होय कालच यासंदर्भात तसे आश्वासन दिले होते. त्यानुसार आता प्रश्नोत्तराचा तास होऊ द्या त्यानंतर आपण याबाबतचे उत्तर देईन, असे सांगत कामकाज पुढे रेटण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्य आणखी आक्रमक पवित्रा धारण करत विधानसभाध्यक्षांचे लक्ष वेधण्यास सुरुवात केली. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी पॉईंट ऑफ प्रोसिजरचा मुद्दा उपस्थित करत म्हणाले की, काही घटना सभागृहात घडतात. तरी काही घटना या विधिमंडळाच्या आवारात घडतात. त्यामुळे माझ्याबाबत नागपूर येथील अधिवेशात जसा पाच मिनिटात घेतलात. तसे सध्याचे विधानसभेचे कामकाज काही मिनिटांसाठी स्थगित करावे आणि जी काही चर्चा झाली त्याची माहिती द्यावी अशी मागणी करत तुम्ही हा निर्णय तात्काळ देणार नसाल तर आम्ही सभात्याग करत असल्याचे जाहिर केले.

त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, आपली यासंदर्भात काल सभागृहात चर्चा झाली. तसेच मात्र एकदा सभागृहाचे कामकाज सुरु झाल्यानंतर विरोधी बाकावरील तुम्ही सदस्यांनी काळ्या फिती लावून कामकाज सहभागी झालात. हे विधिमंडळ नियमावलीचे उल्लंघन नाही का असा सवाल केला.

त्यावर जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर देताना म्हणाले, जो प्रकार घडला त्या घटनेचा माईल्ड निषेध म्हणून दंडाला काळ्या फिती लावलेल्या आहेत. तुम्ही तातडीने निर्णय द्यावा अशी मागणी करत सभात्याग केला.

Check Also

अमित शाह यांची घोषणा, सत्तेवर येताच संपूर्ण देशात समान नागरी कायदा

संपूर्ण देशात समान नागरी कायदा, एकाच वेळी लोकसभा-विधानसभा निवडणुका, ७० वर्षावरील प्रत्येक नागरीकास पाच लाखापर्यंत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *