Breaking News

विधानसभा निवडणूक कधीही होवो, स्वबळावर जिंकण्यास भाजपा सज्ज प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन

पुणे: प्रतिनिधी

आगामी काळात विधानसभेची मध्यावधी किंवा नियमित अशी कधीही निवडणूक झाली तरी स्वबळावर सर्व २८८ जागा लढवून पूर्ण बहुमताने विजय मिळविण्यास भारतीय जनता पार्टी सज्ज आहे, असे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकारांना सांगितले.

महाविकास आघाडीतील घटकपक्ष ज्या प्रकारे एकमेकाशी भांडत आहेत ते पाहता ही आघाडी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल की नाही अशी शंका निर्माण होते. तथापी, सरकार पडेल की टिकेल याचा विचार न करता एक प्रभावी विरोधी पक्ष म्हणून भाजपा ठामपणे काम करत आहे. विदर्भ मराठवाड्यातील प्रचंड पुरानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर पडले नसले तरी पूरग्रस्तांना भेटण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांचा दौरा सुरू झाला आहे. राज्यात मध्यावधी किंवा नियमित अशी केव्हाही विधानसभा निवडणूक झाली तरी स्वबळावर सर्व जागा लढवून पूर्ण बहुमताने विजय मिळविण्याची भाजपाची तयारी आहे. लोकसभेच्याही राज्यातील सर्व ४८ जागा स्वबळावर लढविण्याची भाजपाची तयारी आहे. लोकसभा, विधानसभा किंवा महानगरपालिका अशा सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याची भाजपाने तयारी करावी अशी केंद्रीय नेतृत्वाची सूचना आहे. त्यानुसार संघटना काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील सर्व ९७ हजार बूथमध्ये प्रत्येकी दहा पक्ष कार्यकर्त्यांच्या समित्या नेमण्याचे काम भाजपाने पूर्ण केले आहे. गुजरातचे मुख्यमंत्री व देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीस ७ ऑक्टोबर रोजी २० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राज्यातील बूथ समित्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना ऑनलाईन संबोधित करणार आहेत. त्यावेळी पक्षाचा संघटनात्मक विस्तार सर्वांना जाणवेल. प्रत्येक बूथमध्ये दहाजणांच्या समित्या स्थापन झाल्यावर पक्षाकडून आता प्रत्येकी १८० पर्यंत विस्तार करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

मतभेदानंतरही महाविकास आघाडीचे घटक पक्ष सत्तेसाठी एकत्र राहिले आणि भाजपाच्या विरोधात एकत्र लढले तरी निवडणुकीत त्यांचा सामना करण्याची तयारी भाजपाने केल्याचेही ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १७ सप्टेंबर या वाढदिवसापासून ७ ऑक्टोबरपर्यंत भाजपातर्फे ‘सेवा आणि समर्पण पर्व’ साजरे करण्यात येत आहे. महात्मा गांधी जयंतीनिमित्त शनिवारी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या कोथरूड विधानसभा मतदारसंघात एका सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला. जेट मशिनचा वापर करून हे सार्वजनिक शौचालय पूर्ण स्वच्छ करण्यात आले. तसेच त्याच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले. आगामी आठ दिवसात कोथरूड मतदारसंघातील सर्व सार्वजनिक स्वच्छतागृहांची विशेष स्वच्छता करण्यात येतील आणि त्यानंतर त्यामध्ये महिलांसाठी सॅनिटरी पॅड वितरणासाठी यंत्रे बसविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गांधी जयंतीनिमित्त त्यांनी गांधी खादी भांडारमध्ये खादीचे कापड खरेदी केले. कोथरूड विधानसभा मतदारसंघामध्ये वाचनसंस्कृतीला मदत होण्यासाठी फिरते पुस्तक घर चालविण्यात येणार आहे. त्याचा शुभारंभ त्यांनी केला.

Check Also

आणि वडेट्टीवारांनी उडविली पडळकरांची खिल्ली, “नया नया पंछी ज्यादा फडफड…” वडेट्टीवार पडळकरांचा ओबीसीवरून नवा वाद

मराठी ई-बातम्या टीम ओबीसी आरक्षणावरील सर्वोच्च न्यायालयात उद्या सोमवारी सुणावनी असून या पार्श्वभूमीवर ओसीबी समाजाचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *