Breaking News

१२ आमदार निलंबन प्रश्नी परब-शेलारांमध्ये रंगली खडाजंगीः मात्र सरकारने पळ काढला तालिका अध्यक्षांनी चर्चा करायची नाही विषय बंद

अर्ध्यातासासाठी सभागृह तहकूब झाल्यानंतर पुन्हा सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरु झाले. त्यानवेळी शिवसेनेचे भास्कर जाधव यांनी पुन्हा बोलायला सुरुवात केली. त्यावेळी ते म्हणाले की, भाजपाचे सदस्य सभागृहात आले त्यास माझा आक्षेप नाही. मात्र ते कसे सभागृहात आले, त्यांना परत सभागृहात आणण्यासाठीचा ठराव करण्यात आला का आणि सर्वोच्च न्यायालयाच्या कोणत्या निर्णयाच्या आधारे सभागृहात आले याबद्दलची मला माहिती हवी आहे आणि तोच मुद्दा माझा असल्याचे स्पष्ट केले. तसेच सभागृहाला हे जाणून घेण्याचा हक्क आहे.

भास्कर जाधव बोलत असताना भाजपाचे सदस्य त्यांच्या बोलण्यात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करत होते.

भास्कर जाधव यांच्या या मागणीनंतर भाजपाचे ॲड आशिष शेलार हे उभे रहात म्हणाले की, यासंदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले की सभागृहाने केलेला ठराव हा घटनाबाह्य असून त्याद्वारे इतकी मोठी शिक्षा देता येत नाही. त्यामुळे त्यांनी शिक्षाही रद्द करत इतकी मोठी शिक्षा असू शकत नसल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले. त्यामुळे आम्ही सभागृहात आलो.

शेलारांच्या वक्तव्यानंतर संसदीय मंत्री अनिल परब म्हणाले की, न्यायालयाच्या निकालाचा अभ्यास तुम्ही जसा केला तसा आम्हीही अभ्यास केला. परंतु त्यांनी सोयीचे तेवढे वाचले. यापूर्वीही अशा पध्दतीचे अनेक सुणावन्या झाल्या. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात कोठेही केलेला ठराव अवैध ठरविले नाही. तसेच न्यायालयाने दिलेली शिक्षा फक्त फाशी किंवा जन्मठेप या पध्दतीने निर्णय घेत फाशीच्या ऐवजी जन्मठेप अशी सुनावली. त्यानुसार न्यायालयाने दिलेली शिक्षा फक्त कमी केली. त्यामुळे तुम्ही जे काही वर्णन करताय ते चुकीचे आहे. २०१० साली सरकारने शिवसेनेच्या १० आमदारांना निलंबित केले होते. त्यावेळी मी ही सर्वोच्च न्यायालयात गेलो होतो. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा सभागृहाच्या अधिकारावर भाष्य करण्यास नकार दिला होता.  त्यानुसारच सर्वोच्च न्यायालयाने विधिमंडळाचा ठराव अवैध ठरविला नाही. त्यामुळे निर्दोष मुक्त केल्याचे म्हणता येणार नाही. तुम्हाला संधी देण्यात आली. परंतु तुम्ही सुनावणीसाठी आला नाहीत. त्यामुळे तुम्हाला बोलण्याचा अधिकार नसल्याचे परब म्हणाले.

संसदीय मंत्री अनिल परब यांच्या या स्पष्टीकरणावर भाजपाचे ॲड आशिष शेलार हे पुन्हा बोलण्यास उभे रहात म्हणाले की, संसदीय मंत्री परब साहेब यासंदर्भात न्यायालयानेही भाष्य केले आहे ते जरा ऐका असे सांगत न्यायालयाने दिलेल्या आदेशातील ७२ नंबरचा पॅरामध्ये स्पष्ट म्हणाले की, अधिनियम ३१२ सबक्लॉज १ अन्वये विधानसभेने मंजूर केलेला तो ठराव उल्लघंन करणारा आहे. त्यामुळे तुमच्या अहंकारामुळे आम्हालाही तिथे मान खाली घालावी लागली आणि सदनाच्या अध्यक्ष पदाच्या खुर्चीलाही बोलणे ऐकावे लागल्याचे स्पष्ट करत सुरुवातीला न्यायालयाने तुम्ही तुमच्या पातळीवर प्रश्न सोडवण्याची संधी दिली. त्यानुसार आम्हाला सभागृहाकडे दाद मागण्यास सांगितले, त्यानुसार आम्ही दाद मागितली. परंतु त्यावर अधिवेशन झाल्यानंतर आम्हाला सुनावणीची तारीख देण्यात आली. त्यावेळी आलो पण तुम्ही सुनावणी घेतली नाही. केवळ आणि केवळ तुमच्या अहंकारी वृत्तीमुळेच या गोष्टी झाल्याचा पलटवार अनिल परब यांच्यावर शेलार यांनी केला. तसेच तुमच्या सहमतीने रेकॉर्डवर असलेली चुकीची माहिती तुम्ही काढुन टाका अशी सूचनाही केली.

आशिष शेलार हे बोलत असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे खाली बसून बोलत होते. त्यामुळे चिडलेल्या शेलारांनी मी तुझ्या परवानगीने सभागृहात आलो नाही असा एकेरी उल्लेख केला.

शेलार यांच्यानंतर काँग्रेस नेते नाना पटोले हे बोलण्यासाठी उभे राहिले त्यावेळी तालिका अध्यक्षांनी आता हा विषय बंद करा यावर आता चर्चा होणार नाही. मंत्र्यांनी उत्तर दिले असे सांगत पटोले यांना बोलण्याची संधी नाकारली. आणि पुढील कामकाज पुकारले.

Check Also

भाजपाच्या या केंद्रीय मंत्र्यांकडे त्या लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी

केंद्रीय मंत्र्यांच्या मार्गदर्शनात राज्यातील १७ लोकसभा मतदारसंघातील संघटना बांधणीसाठी भाजपा, महाराष्ट्रतर्फे लोकसभा प्रवास योजना आजपासून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *