Breaking News

देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार मुनगंटीवार, सामंत यांचा गुजरात दौरा गुजरातच्‍या सि.एम. डॅशबोर्ड चा अभ्‍यास करण्‍यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या नेतृत्‍वात अहमदाबाद दौरा

राज्यात स्थानापन्न झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारचा कारभार प्रत्यक्ष कोण चालवतो यावरून सातत्याने विरोधकांकडून आरोप करण्यात येतात. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याऐवजी राज्याचा गाडा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच चालवित असल्याचा आरोपही करण्यात येतात. आता या आरोपांना पुष्टी देणारी एक घटना नुकतीच पुढे आली आहे. राज्याचे वनमंत्री आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी नुकत्याच केलेला दौरा हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसारच झाल्याची माहिती मंत्रालयातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.

तसेच या दौऱ्यात सरकारी बाबूंबरोबरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या कार्यालयातील बिगर सरकारी अधिकाऱ्यांना आवर्जून पाठविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारवर फडणवीस यांचेच नियंत्रण असल्याचे सिध्द होत आहे.

या दौऱ्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या अभ्यास गटासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू आणि त्यांच्या कार्यालयातील बिगर सरकारी विशेष कार्यकारी अधिकारी कौस्तुभ धवसे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी आशिष कुलकर्णी यांचा समावेश करण्यात आला होता हे विशेष.

राज्‍याचे वन व सांस्‍कृतीक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या नेतृत्‍वात सी.एम.– डॅशबोर्ड गुजरात यांचा अभ्‍यास करण्‍यासाठी २६ सप्‍टेंबर रोजी प्रस्‍तावित अभ्‍यासगटाने अहमदाबाद येथे भेट दिली. यावेळी सुधीर मुनगंटीवार यांच्‍यासह उद्योग मंत्री उदय सामंत, मुख्‍यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, महाराष्‍ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाच्‍या व्‍यवस्‍थापक श्रीमती जयश्री भोज, मुख्‍यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी आशिष कुलकर्णी, उपमुख्‍यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी कौस्‍तुभ धवसे यांची उपस्थिती होती.

यावेळी गुजरातच्‍या सनदी अधिकारी मुख्यमंत्री यांच्या सचिव श्रीमती अवंतिका सिंग, गुजरातच्‍या मुख्‍यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी एम. डी. मोदीया, योगेंद्र देसाई, प्रशांत त्रिपाठी, एनआयसीचे वरिष्‍ठ तांत्रिक संचालक आनंद शहा, वरिष्‍ठ प्रणाली विकासक शैलेश खनेश यांनी गुजरात शासनाच्या सी.एम. डॅशबोर्डबाबत सादरीकरण केले.

सी.एम. डॅशबोर्ड गुजरात यांचा अभ्‍यास करण्‍यासाठीच्‍या अभ्‍यासगटाने सी.एम. डॅशबोर्ड बाबात विस्‍तृत माहिती जाणून घेतली. या डॅशबोर्डच्‍या आधारे महाराष्‍ट्रातही सी.एम. डॅशबोर्ड ही संकल्‍पना कशी राबविता येईल यादृष्‍टीने अभ्‍यासगटातील सहका-यांच्‍या मदतीने प्रयत्‍न करू असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्‍हणाले.

या संदर्भात राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले, गुजरातने तयार केलेल्या सी.एम.डॅशबोर्ड हा तेथील जनतेशी कनेक्टड आहे. त्याचबरोबर उद्योगांशीही निगडीत आहे. एखादी तक्रार आल्यास त्या तक्रारीचा निकाल कोणी लावायचा आणि कसा लावायचा याची सूचना या डॅशबोर्डवरून मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात येते. ही एक चांगली संकल्पना आहे. त्यामुळे महाराष्ट्राबरोबर इतर राज्यातही अशा पध्दतीची संकल्पना राबवायला हरकत नाही.

दरम्यान, गुजरातमधील अनेक विकास मॉडेल्सबाबत आता पर्यत अनेकदा पोलखोल करणाऱ्या गोष्टी उघडकीस आले आहेत. त्यामुळे आता सी.एम.डॅशबोर्डची संकल्पनेच्या माध्यमातून अशीच फसव्या गोष्टी राज्यात तर सुरु होणार नाही ना? अशी चर्चा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कार्यालयातील शासकिय अधिकाऱ्यांमध्ये सुरु झाली आहे.

Check Also

ऑनलाईन गेमिंग क्षेत्रातील तरूणाईशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील अव्वल ऑनलाईन गेमिंग क्षेत्रातील गेमरशी संवाद साधला. मात्र यागेमर्सनी पंतप्रधान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *