Breaking News

तरूणांच्या रोषानंतरही सैन्य दलाच्या तिन्ही प्रमुखांनी अग्निपथप्रकरणी केली ‘ही’ घोषणा योजना मागे घेणार नसल्याची स्पष्टोक्ती

काही दिवसांपूर्वी केंद्रिय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेत संरक्षणातील भरतीसाठी नवी अग्निपथ योजना जाहिर केली. या योजनेची घोषणा केल्यानंतर उत्तर प्रदेश, बिहार, पंजाबसह देशातील अनेक राज्यांमध्ये नवतरूणांकडून मोठ्या प्रमाणावर विरोध करण्यात येत असून निदर्शने, जाळपोळीच्या घटनाही घडत आहेत. यापार्श्वभूमीवर केंद्रिय गृहमंत्रालयाकडून अग्निवीरांसाठी विविध सवलती देण्यात येत आहेत. तरीही नवतरूणांचा विरोध काही केल्या कमी होताना दिसून येत नाही. यापार्श्वभूमीवर नौदल, वायुदल आणि भूदल या तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेत अग्निपथ योजनेबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.

यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना या सैन्यदलप्रमुखांनी स्पष्ट केले की, केंद्र सरकारने जाहीर केलेली अग्निपथ योजना रद्द होणार नसून लवकरच या योजनेअंतर्गत भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. तसेच भरती अगोदर युवकांना हिंसा आणि तोडफोडीत सहभागी नसल्याचे प्रमाणपत्र देणे बंधनकारक असल्याचेही लष्कराकडून स्पष्ट करण्यात आले. तिन्ही सेना दलाच्या वतीने आज संयुक्त पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना लेफ्टनंट जनरल अनिल पुरींनी ही माहिती दिली.

योजनेला वाढता विरोध पाहता केंद्र सरकारने या योजनेमध्ये अनेक तरतुदी जाहीर केल्या आहेत. या योजनेसाठी वयोमर्यादा दोन वर्षांनी वाढवण्यात आली आहे. तसेच अग्निवीरांसाठी संरक्षण मंत्रालय आणि कोस्ट कार्डमध्ये १० टक्के जागा आरक्षित ठेवण्यात आली आहे. पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या अग्निवीरांसाठी संरक्षण मंत्रालयातील नोकऱ्यांच्या १० टक्के जागा राखीव ठेवण्याच्या प्रस्तावाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंजूरी दिली आहे. हे आरक्षण माजी सैनिकांसाठीच्या सध्याच्या आरक्षणाव्यतिरिक्त असणार असल्याचे लष्कराकडून स्पष्ट करण्यात आले.

तसेच देण्यात येत असलेल्या सवलती या नवतरूणांच्या वाढत्या निदर्शनाच्या पार्श्वभूमीवर त्या देण्यात आलेल्या नाहीत. तर त्या योजनेतच आधीपासून समाविष्ट करण्यात आल्या होत्या. लष्कर हे शिस्तबध्द असते. तेथे बेशिस्तीला थारा नाही. त्यामुळे शिस्तबध्द असणाऱ्यांनाच लष्करात भरती केले जाते. केवळ निदर्शने होत आहेत म्हणून सवलती जाहिर केल्या गेल्या नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

जनरल सी बन्सी बोपण्णा म्हणाले की, ऑगस्टच्या पहिल्या मध्यात भरती प्रक्रियेला सुरुवात होईल आणि पहिली अग्निवीरांची बॅच डिसेंबरमध्ये तायर होवून बाहेर पडेल. तर दुसरी भरती प्रक्रिया फेब्रुवारीमध्ये सुरु होईल. अग्निपथच्या भरतीप्रक्रियेसाठी ८३ ठिकाणी भरती प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अग्निपथ योजनेअंतर्गत येत्या २४ जूनपासून वायू दलात भरती प्रक्रियेस सुरुवात होणार आहे. तसेच भारतीय लष्कराकडूनही लवकरच भरती प्रक्रियेबाबत अधिसूचना जारी केली जाईल असे सांगण्यात आले आहे. २०५० पर्यंत ५० टक्के लोकसंख्या ही ५० वर्षाच्या आतील असेल. त्यामुळे लष्कराला जोश आणि होश असणाऱ्या युवकांची गरज असल्याचे पुरी यांनी स्पष्ट केले.

गेल्या काही दिवसांपासून अग्निपथ योजनेविरोधात देशभरात आंदोलने सुरु आहेत. अनेक ठिकाणी या अंदोलनांना हिंसक वळण लागले आहे. उत्तर प्रदेश, बिहारसोबत तेलंगणामध्ये तरुणांनी तोडफोड करत रेल्वे डब्यांना आग लावल्याच्या घटना घडल्या आहेत. या अंदोलनात मोठ्या प्रमाणात सरकारी मालमत्तेसह सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. आज काँग्रेस पक्षाकडूनही अग्निवीर योजना मागे घेण्यात यावी या मागणीसाठी दिल्लीतील जंतरमंतरवर सत्याग्रह करण्यात आला. या सत्याग्रहात काँग्रेस नेत्या प्रियांका गांधींसह अनेक काँग्रेस नेते सहभागी झाले होते.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *