Breaking News

अजित पवार म्हणाले, काहीही जण सकाळी सकाळी टाकतात तर मी कामाला सुरुवात करतो पवारांचा रोख मनसे प्रमुख राज ठाकरेंकडे तर नाही ना चर्चेला सुरुवात

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज नेवासा येथील सभेत बोलताना राज्यातल्या शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली. अजित पवार यांनी शिवसेनेचे बंडखोर आमदार, रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार, राज्यात न आलेले प्रकल्प आणि सुरू असलेल्या प्रकल्पांवरील स्थगितीवरून राज्य सरकारचा समाचार घेतला. राज्यात नवं सरकार स्थापन होऊन ६ महिने झाले तरी मंत्रिमंडळ विस्तार का झालेला नाही? असा सवाल त्यांनी सरकारला केला.

या सभेत अजित पवार म्हणाले की, आमदार प्राजक्त तनपुरे आणि माझे इतर सहकारी यांनी सांगितलं की, अजित पवार सकाळी-सकाळी लवकर कामाला सुरुवात करतात. पण त्यात काय वाईट आहे? काहीजण सकाळी सकाळी टाकायला सुरुवात करतात आणि मी कामाला सुरुवात करतो. हे वाईट आहे का? उगाच चंद्रावर जाऊन वाटोळं करण्यापेक्षा लोकांची कामं केलेली बरी. दरम्यान, अजित पवार हे बोलत असताना त्यांचा नेमका रोख कोणाकडे होता यावरून चर्चा सुरू झाली.

एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी करून पक्षापासून वेगळी चूल मांडली. या आमदारांनी वेगळा गट स्थापन करून भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्यावर राज्यात सरकार स्थापन केलं. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन राज्याचा कारभार सुरू केला. त्यानंतर तब्बल दीड महिन्यांनी या सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला. यावेळी १८ नव्या मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. परंतु अद्याप या सरकारचा पूर्ण मंत्रिमंडळ विस्तार होणं बाकी आहे. यावरून विरोधी पक्ष सातत्याने राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहे.

मंत्रिमंडळ विस्तारावरून अजित पवार म्हणाले की, शिंदे-फडणवीस सरकारने अनेक आमदारांना मंत्रीपदाचं गाजर दाखवून सोबत घेतलं होतं. यापैकी बऱ्याच जणांनी मंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी नवीन सूट देखील शिवले, नवस केले, अभिषेक केला पण त्यांना मंत्रीपद अद्याप मिळालं नाही.

पवार म्हणाले, राज्यातलं हे सरकार घटनाबाह्य आहेच तसेच हे स्थगिती सरकार देखील आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर झालेल्या अनेक प्रकल्पांना या सरकारने स्थगिती दिली. तसेच बरेच मोठे प्रकल्प या सरकारमुळे आपण गमावले. राज्यातले काही प्रकल्प इतर राज्यात गेले. माझ्या जिल्ह्यात येणारा १.५ लाख कोटी ते २ लाख कोटी रुपयांचा प्रकल्प गुजरातला गेला. यामुळे २ लाख तरुणांना रोजगार मिळाला असता असेही म्हणाले.

Check Also

मुख्यमंत्री शिंदेंनी दिली माहिती, शेतकरी लाँग मार्चच्या ‘या’ मागण्या मान्य शेतकऱ्यांनी लाँग मार्च आंदोलन थांबवावे; मुख्यमंत्र्यांचे आवाहन

शेतकरी लाँग मार्चच्या मागण्यांवर राज्य शासनाने सकारात्मक निर्णय घेतले असून त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *