Breaking News

अजित पवार मास्कबद्दल म्हणाले, त्या डिझाईनवाल्याचा उपयोग नाही सर्जिकल आणि एन-95 मास्कच वापरा

मराठी ई-बातम्या टीम
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेनंतर घराबाहेर जायचे असेल तर मास्क वापरणे राज्य आणि केंद्र सरकारने बंधनकारक केले आहे. त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांनी आणि कंपन्यांनी वेगवेगळ्या डिझाईनचे कापडी मास्क बाजारात आणले आहेत. मात्र हे मास्क लोकांच्या खरोखरीच उपयोगाचे आहेत का याबाबत नेहमीच चर्चा होत होती. मात्र त्यावर ठामपणे आणि अधिकारवाणीने कोणी सांगत नव्हते.
परंतु अखेर यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खुलासा केला असून नव्या डिझाईनचे मास्क कोणत्याही उपयोगाचे नसून त्याचा फायदा काहीही होत नसल्याचे स्पष्ट केले.
पुण्यात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पुणे जिल्ह्याचा आढावा घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे हे ही उपस्थित होते.
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेकांकडून डिझाईन असलेले मास्क वापरण्यात येत आहेत. मात्र त्या डिझाईऩवाल्या मास्कचा काहीही उपयोग होत नसल्याचे त्यांनी सांगितले.
त्यामुळे नागरीकांनी स्वतःचे संरक्षण करण्यासाठी डबल मास्क वापरण्याऐवजी डबल लेअर असलेला सर्जिकल मास्क आणि एन-95 मास्क वापरावा असे डॉक्टरांनीच सांगितल्याचे स्पष्ट करत नागरीकांनी तशा स्वरूपाचे मास्क वापरावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
त्याचबरोबर सध्या पुण्यात ५० टक्के उपस्थिती बंधनकारक करण्यात आला आहे. तर ५० टक्के वर्क फ्रॉम होम असा निर्णयही करण्यात आला आहे. त्यामुळे आजच्या बैठकीनंतर पुण्यासाठी जे नियम निश्चित करण्यात आले ते जाहीर करण्यात आले आहेत. राज्यासंदर्भात राज्यस्तरीय जे काही निर्बंध असतील ते मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर जाहीर करण्यात येतील. उद्या सकाळी ९ वाजता मुख्यमंत्र्यासोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर राज्यासाठी नवे निर्बंध जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
वाढत्या ओमायक्रॉन रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारशी सातत्याने संपर्क करण्यात येत आहे. त्यांच्याकडून काही गोष्टींवरील किंमती निश्चित कऱण्यात आल्या आहेत. त्या किंमती राज्याला परवडण्यासारख्या नाहीत. त्याची माहिती केंद्राला कळविण्यात आलेली आहे. तसेच ओमायक्रॉनवरील उपचाराचा प्रोटोकॉल अद्याप केंद्र सरकारने निश्चित केलेला नाही. तो ठरला की त्याची माहिती सर्व डॉक्टरांना देण्यात येणार असल्याचे सांगितले.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *