Breaking News

उध्दव ठाकरेंनी ठाण्यात साधला मुख्यमंत्री शिंदेवर निशाणा, मात्र आनंद आश्रमात जाणे टाळले ठाण्यातील आरोग्यासाठी लवकरच परत येणार असल्याचा शिंदे गटाला दिला इशारा

राज्यात शिवसेनेतील उभ्या फुटीनंतर या फुटीचे नेतृत्व करणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे आज पहिल्यांदाच आरोग्य शिबिराच्या निमित्ताने आले. यावेळी उध्दव ठाकरे यांनी शिंदे गटावर निशाणा साधताना म्हणाले, निष्ठेच्या पाघंरूणाखाली काही मिंधे लपले होते. अस्सल कडवट शिवसैनिक असा विकला जाऊ शकत नाही अशी खोचक टीका एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटावर करत मी लवकरच ठाण्याच्या आरोग्यासाठी पुन्हा येणार असल्याचा इशाराही शिंदे गटाला दिला.

तत्पूर्वी उध्दव ठाकरे यांनी टेंभी नाक्यावरील आनंद दिघे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. मात्र त्यांनी आनंद दिघे यांच्या नावे असलेल्या आनंद आश्रमात जाण्याचे टाळले.

शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या टेंभी नाका या ठिकाणी आनंद आश्रम आहे. आज उद्धव ठाकरे ठाण्यात येणार होते त्याआधी आज सकाळी या आनंद आश्रमावर बाळासाहेबांची शिवसेना हा फलक उभारण्यात आला. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी आनंद आश्रम या ठिकाणी जाणं टाळलं असल्याचं बोललं जातं आहे. हा फलक लागला तेव्हापासूनच आता उद्धव ठाकरे या ठिकाणी येणार नाहीत अशी चर्चा सुरू झाली होती. घडलंही तसंच.

ठाण्यातल्या टेंभीनाका भागात असलेल्या आनंद आश्रमात दिवंगत आनंद दिघे वास्तव्यास होते. याच आश्रमातून आनंद दिघे पक्षाचा कारभार करत असत. आनंद दिघे यांच्या मृत्यूनंतर शिवसैनिक या आश्रमात येऊ लागले. मात्र एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर आणि शिवसेनेत ठाकरे गट विरूद्ध शिंदे गट असे दोन गट पडल्यानंतर आनंद आश्रमात कोण जाणार? यावरून दोन्ही गटांमध्ये धुसफूस सुरू होती. त्यानंतर काही दिवस दोन्ही गट आनंद आश्रम या ठिकाणी जात होते. मात्र आज सकाळीच या आनंद आश्रम या जागेवर बाळासाहेबांची शिवसेना हा फलक लावण्यात आला. उद्धव ठाकरे यांनी त्यामुळेच या आश्रमात येणं टाळलं असं बोललं जातं आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे ठाण्यात आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. या शिबीरास पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. त्यावेळी छोटेखानी भाषणात उध्दव ठाकरे म्हणाले, जे अस्सल शिवसैनिक निखाऱ्यासारखे माझ्यासोबत राहिले आहेत हे निखारेच उद्या राजकारणात मशाल पेटवणार आहेत असं म्हणत ठाण्यात उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या सगळ्यांना टोला लगावला. तसंच महाराष्ट्रात जे काही घडलं त्यामुळे महाराष्ट्राची बदनामी झाली. एवढंच नाही तर मी लवकरच ठाण्यात सभा घेणार आहे असंही उद्धव ठाकरेंनी जाहीर केले.

उद्धव ठाकरे यांनी सत्तांतरानंतर पहिल्यांदाच ठाण्याचा दौरा केला. ठाण्याच्या दौऱ्यात ते आनंद आश्रमात येऊ नयेत म्हणूनच तिथे बाळासाहेबांची शिवसेना हा फलक लावण्यात आला असल्याची चर्चा ठाण्यात रंगली आहे.

Check Also

प्रकाश आंबेडकर यांचा अल्टीमेटम, महाविकास आघा़डीला २६ मार्च पर्यंतची मुदत

आगामी लोकसभा निवडणूकीत काहीही करून भाजपाला केंद्रातील सत्तेत जाण्यापासून रोखण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *