Breaking News

पावसाळी अधिवेशनः ५० खोके एकदम ओके…., आले रे आले गद्दार आले…. गगणभेदी घोषणांनी विधानभवन दणाणले

शिवसेनेतील शिंदे गटाच्या बंडानंतर राज्यात शिंदे फडणवीस सरकार सत्तेत स्थानापन्न झाल्यानंतर या सरकारचं हे पहिले पावसाळी अधिवेशन, पायउतार झालेले कालचे सत्ताधारी आणि आजचे विरोधक जोरदार हल्लाबोल करणार हे निश्चित होते. आज त्यांनी सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापुर्वी विधानभवनाच्या पायऱ्यावर बसून क्रिएटिव्ह अशी रचनात्मक घोषणाबाजी केली. ५० खोके… एकदम ओके… या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय…अशा जोरदार घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आगमनावेळी देत परीसर दणाणून सोडला.

भाजपाचे सुधीर मुनगंटीवार समोर येताच सुधीरभाऊंना कमी दर्जाचे खाते देणाऱ्या सरकारचा… आशिष शेलार यांना मंत्रिमंडळात न घेणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा घोषणांनी विधानभवन अक्षरशः डोक्यावर घेतले. या घोषणाबाजीमुळे विरोधकांनी त्यांचा आवाज मोजक्या अन् ठोस शब्दात सरकार आणि जनतेपर्यंत पोहोचला असल्याचं पाहायला मिळत आहे. राजकीय वर्तुळात याच घोषणांची चर्चा रंगली होती.

३० जूनला एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाला. आता राज्यात शिंदे सरकार स्थापन झाले आहे. नुकतंच या नवीन सरकारचा मंत्रिमंडळ विस्तारही झाला. शिंदे गटाकडून नऊ तर भाजपाच्या नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

दरम्यान, आज १७ ऑगस्ट पासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले. आता हे अधिवेशन किती वादळी ठरणार याची पहिली झलक अधिवेशनाआधी विरोधकांनी केलेल्या घोषणाबाजीतून दिसून आली. विधिमंडळाच्या पायऱ्यावर विरोधकांनी घोषणाबाजी केली. “ ५० खोके एकदम ओके!’ “रोख घेऊन ओके झालेल्या सरकारचा धिक्कार असो!’ अशा घोषणा दिल्या गेल्या या घोषणांनी विधिमंडळ परिसर दुमदुमुन गेला होता.

दुसरीकडे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर निषेध करताना माजी मंत्री शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील शिंदे-फडणवीस सरकारवर खोचक टीका केली. “हे गद्दार सरकार आहे, ते कोसळणार म्हणजे कोसळणारच,” अशी टिका त्यांनी केली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाही दिल्या. आमदार प्रकाश सुर्वे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, “हे डरपोकांचं विधान आहे. मुख्यमंत्री आणि खऱ्या मुख्यमंत्र्यांचा काही अंकुश राहिलेला नाही. आता तुम्ही मला सांगा खरे मुख्यमंत्री कोण आहेत?” असं देखील आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

तर “आले रे आले गद्दार आले..’ असं म्हणत त्यांनी शिंदे गटाला टोला लगावला. धनंजय मुंडे, शशिकात शिंदे, अनिल परब आदी घोषणाबाजी करण्यात आघाडीवर होते.

ओला दुष्काळ जाहीर करा… अतिवृष्टीग्रस्तांना मदत करा… ईडी सरकार हाय हाय… या सरकारचं करायचं काय… खाली डोकं वर पाय… आले रे आले ५० खोके आले… खोके घेऊन ओके झालेल्या सरकारचा धिक्कार असो… स्थगिती सरकार हाय हाय… महाराष्ट्राशी गद्दारी, सत्तेत आली शिंदेची स्वारी… आले रे आले गद्दार आले.. अशा गगनभेदी घोषणा देत महाविकास आघाडीतील पक्षाच्या आमदारांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला… आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून विरोधी पक्षांच्यावतीने ईडी सरकारला धारेवर धरण्यात आले.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत ईडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देत आक्रमकपणे सरकार विरोधात लढणार असल्याचे स्पष्ट केले.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *