Breaking News

राज्यपालांवरील शरद पवारांच्या टीकेला फडणवीसांनी दिले “हे” उत्तर राज्यपाल हटाव मोहिमच दिसतेय

राज्यात महाविकास आघाडी सरकार विरूध्द राज्यपाल भगतसिंग कोश्यारी असा संघर्ष सातत्याने बघायला मिळत आहे. मात्र हा संघर्ष दिवसेंदिवस कमी होण्याऐवजी या ना त्या कारणाने या भरच पडत असल्याचे दिसून येत आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्यासंदर्भात केलेले वादग्रस्त वक्तव्य आणि राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी राज्यपालांच्या अभिभाषणाच्या वेळी गोंधळ झाला. या गोंधळामुळे राज्यपालांनी अभिभाषण अर्धवट सोडून निघून गेले. राज्यपालांच्या या कृतीचा मंत्रिमंडळाने निषेध केला. या साऱ्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही राज्यपालांबद्दल न बोललेच बरे सांगत राज्यपालांना उपरोधिक टोला लगावला. शरद पवारांनी राज्यपालांवर केलेल्या या टीकेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देत शरद पवार काय किंवा संजय राऊत यांची वक्तव्ये पाह्यली की त्यांचा राज्यपाल हटाव मोहिमेचा अजेंडा असल्याचे दिसून येत असल्याचे सांगत राज्यपालांना मुद्दाम लक्ष्य करण्यात येत असल्याचा आरोप केला.

आज पुण्यामध्ये एका कार्यक्रमात बोलताना शरद पवारांनी राज्यपालांवर टीका करताना म्हणाले की, हल्लीच्या राज्यपालांवर भाष्य न केलेले बरे. केंद्र सरकार घसरुन कोणत्या पातळीवर जात आहे याचे उदाहरण महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. राज्यातील मंत्रिमंडळाला विधानसभा, विधानपरिषदेवर सभासद नेमण्याचा अधिकार आहे. वर्ष होऊन गेला तरी १२ आमदारांच्या बाबतीत निर्णय घेतला जात नाही. याचा अर्थ एवढाच आहे की, ज्या पदाची प्रतिष्ठा महाराष्ट्रात अनेकांनी सांभाळली ती आम्ही ठेवणारच नाही हा निर्धार ठेऊन कोणी काम करत असेल तर त्याच्यावर भाष्य न केलेले बरे. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी त्याचा विचार करावा.

नागपूर विमानतळावर उतरल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर देत म्हणाले की, शरद पवार असतील, संजय राऊत असतील सर्वांच्या वक्तव्यांमधून राज्यपाल हटाओ मोहीमच दिसतेय, राज्यपालांना मुद्दाम लक्ष्य केले जात आहे. महाविकास आघाडीकडून संविधानात न बसणारी काम केले जात असल्याचा दावा करत हे काम दाखवून दिल्यावर राज्यापालांना टार्गेट केले जातेय.

मला असे वाटते की जाणीवपूर्वक असंवैधानिक कृती करायच्या आणि मग राज्यपालांच्या विरुद्ध बोलायचे. एक प्रकारचा नरेटीव्ह तयार करण्याचा प्रयत्न सातत्याने सुरु असल्याचा आरोप करत फडणवीस म्हणाले, मला असे वाटते की राज्यपाल एका संविधानिक पदावर बसलेली व्यक्ती आहे. ती संविधानानेच काम करते. त्यामुळे अशाप्रकारे त्यांना टार्गेट करणं अतिशय अयोग्य आहे.

सरकार संविधानानुसार काम करत नाही. ज्याप्रकारचे कायदे आणि कायदा दुरुस्ती सरकार करत आहे ते कुठेच संविधानाच्या नियमांमध्ये बसत नाहीत. जेव्हा राज्यपाल याकडे लक्ष वेधतात तेव्हा त्यांना टार्गेट केलं जाते. त्यांचा अपमान केला जातो. हे पूर्णपणे चुकीचं असल्याचेही सांगितले.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *