मागील फडणवीस सरकारच्या काळात कोकणातील नाणार प्रकल्पावरून भाजपाबरोबर संघर्षाच्या भूमिकेत राहीलेल्या शिवसेनेचे आता मत परिवर्तन होत असल्याचे दिसून येत असून यासंदर्भात नाणार प्रकल्पाला जर नागरीकांचा विरोध नसेल तर तो स्थलांतरीत केला जाईल. तसेच तेथील नागरीकांचाही त्यास विरोध नसेल हे पहावं लागणार असल्याचे वक्तव्य राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज केले.
आदित्य ठाकरे हे आज कोकणच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी याबाबत विचारले असता त्यांनी वरील मत व्यक्त केले.
हा एक वेगळा विषय आहे. स्थलांतरित करण्याचा विषय आहेच पण दुसरीकडे न्यायचा तिथे लोकांचा विरोध नसेल हे पहावं लागेल. लोकांना सोबत घेऊन, चर्चा करुन, स्थानिक भूमीपुत्रांना न्याय कसा मिळेल याचा विचार करुनच निर्णय घेतला जाईल असेही ते म्हणाले.
हायवे, रस्ता किंवा कोणताही मोठा प्रकल्प असेल तर स्थानिक लोकांना, भुमिपुत्रांना विश्वासात घेऊनच पुढे जाणार असल्याचे सांगत आदित्य ठाकरे म्हणाले की, एकदा विश्वास बसला, मनातील शंका दूर झाल्यानंतरच आपण ते काम पुढे नेण्याचा प्रयत्न करतो असेही त्यांनी स्पष्ट केले.
नाणार येथील तेलशुद्धीकरण प्रकल्पामध्ये महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत लाखो कोटी रुपयांचे आणि रोजगाराचे योगदान देण्याची क्षमता आहे. गेली काही वर्षे विरोधामुळे तो प्रकल्प रखडला असला तरी आता महाराष्ट्र सरकारचे मनपरिवर्तन होत असल्याचे दिसत असल्याने नाणार प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनाची आशा असल्याचे सूतोवाच केंद्रीय शिक्षण व कौशल्य विकासमंत्री धर्मेद्र प्रधान यांनी एका प्रसारमाध्यमाच्या कार्यक्रमात केले.
संयुक्त अरब अमिरात आणि सौदी अरेबिया यांच्या सहकार्याने कोकणच्या किनारपट्टीवर ६० लाख टन क्षमतेचा नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचे नियोजन करण्यात आले होते, मात्र दुर्दैवाने त्याला विरोध झाला. त्यात बहुमूल्य वेळ वाया गेला आहे. पण आता महाराष्ट्र सरकारचे मतपरिवर्तन होत असल्याचे संकेत मिळत आहेत. प्रकल्पाचा आकार कमी करून तो कोकणातच उभारण्याचा विचार सुरू आहे. ‘देर आए लेकिन दुरुस्त आए’ या न्यायाने सरकारच्या मतपरिवर्तनाचे स्वागतच केले पाहिजे, असे सांगत धर्मेद्र प्रधान यांनी नाव न घेता शिवसेनेला चिमटा काढला. या तेलशुद्धीकरण प्रकल्पामुळे लाखो कोटी रुपये पुढील काही वर्षांत महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत येतील. या प्रकल्पाशी निगडित पूरक उद्योग उभे राहतील आणि त्यातूनही मोठय़ा प्रमाणात रोजगाराची निर्मिती होईल अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
