युध्दनौका आयएनएस विक्रांतला वाचविण्यासाठी कोट्यावधी रूपये जमा करत ते पैसे निवडणूकीत वापरले असल्याचे सांगत शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी करत आता राजभवनावरून आलेल्या कागदपत्रांपेक्षा वेगळी खोटी कागदपत्रे तयार कऱण्याचे काम सोमय्याकडून सुरु असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
भाजपाने भाग सोमय्या भाग नावाचा चित्रपट काढावा. सोमय्या गायब असल्याने आता भाग सोमय्या भाग हा नवा सिनेमा काढावा. गुन्हा केला नाही तर घाबरता का? इतरांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे आणि लोकांना कायदा पाळण्याचे ज्ञान देणारे आता का पळत आहेत? असा सवालही त्यांनी केला.
किरीट सोमय्या यांना भाजपाशासित राज्यांनी आश्रय दिल्याचा आरोप करत महाराष्ट्राला हवे असलेल्या आरोपींना गुजरात आणि गोवा राज्यात आश्रय दिला जातो. सोमय्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आल्याने आता संबंधित राज्यातील पोलिसांनी त्याला अटक करून मुंबई पोलिसांच्या ताब्यात द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.
विक्रांतच्या वर्गणीतून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर सोमय्या यांनी अटकपूर्व जामीनाचा अर्ज दाखल केला होता. मुंबई सत्र न्यायालयाने आज हा जामीन अर्ज फेटाळून लावला.
यावेळी संजय राऊत यांनी सोमय्या आणि भाजपावर टीका केली. सोमय्या बाप- बेटे तुरुंगात जाणार असल्याचा पुनरुच्चारही केला.
अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून सेटिंग लावून खोटी प्रमाणपत्रे तयार करण्याचे काम सुरू आहे. मात्र या प्रकरणात पुरावे असल्याने जामीन अर्ज फेटाळण्यात आला. त्यामुळे आता बाप- बेटे तुरुंगात जाणार असून त्यांनी बुडताना भाजपा नेत्यांचे हात पकडले आहेत, अशी टीकाही यांनी केली.
विक्रांतला भंगारात टाकताना सोमय्याने भाजपाला बुडविण्याचा प्रयत्न केल्याचा टोलाही त्यांनी लागवला. सोमय्याच्या एका प्रकरणाचा पर्दाफाश झाला आहे. अजून अनेक प्रकरणे रांगेत आहेत, असा दावाही त्यांनी केला.
सोमय्या हा ब्लॅकमेलर, मुखवटे घालून फिरणारा, ईडीचा फ्रंटमॅन आणि आर्थिक टोळी चालवणारा माणूस आहे. अशा व्यक्तीला केंद्र सरकारने सुरक्षा दिली आहे. सैनिकांच्या बलिदानाचा अवमान करणाऱ्या सोमय्याची केंद्र सरकारने सुरक्षा व्यवस्था काढून घ्यावी आणि केंद्रीय तपास यंत्रणांनी सोमय्याला शोधून महाराष्ट्र पोलिसांचा ताब्यात द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
सोमय्याने विक्रांतच्या नावाखाली मिळालेले पैसे पक्षाकडे जमा केल्याची माहिती दिली आहे. २० ते २५ कोटी रुपये निवडणुकीसाठी वापरले आणि बाकीचे पैसे पीएमसी बँकेमार्फत पांढरे करण्यात आले. आर्थिक गुन्हे शाखा जेव्हा सोमय्यला ताब्यात घेईल तेव्हा आणखी माहिती समोर येईल असे सांगत भाजपाने निवडणुकीसाठी पैसे वापरले असतील तर भाजपाला सुद्धा आरोपी करावे लागेल. त्यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि खजिनदार कोण होते हे तपासले पाहिजे आणि भाजपाने याप्रकरणी खुलासा केला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
