Breaking News

नाना पटोले म्हणाले, महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला, नागपूरची जागा काँग्रेसला शिवसेनेचा पाठिंबा शुभांगी पाटील यांना

नाशिक मतदारसंघात काँग्रेस नेते सुधीर तांबे आणि त्यांचे पुत्र सत्यजीत तांबे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी परिस्थिती स्पष्ट झाली. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघातील मविआ उमेदवार शुभांगी पाटील असल्याचं जाहीर करत नाशिकची जागा शिवसेना लढवित असल्याचे जाहीर केले.

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेनतर ते काही खाजगी वृत्तवाहिन्यांशी बोलत होते.

यावेळी पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले, जो काही निर्णय द्यायचा तो हायकमांड देईल. आमचे जे निर्णय झाले आहेत, त्याप्रमाणे कार्यवाही सुरू झाली आहे. नागपूरची जागा काँग्रेसला देण्यात आली आहे आणि नाशिकमध्ये आम्ही महाविकासआघाडी म्हणून शुभांगी पाटील आमच्या उमेदवार आहेत.

शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले होते, अद्याप कोणालाही पाठिंबा जाहीर केलेला नाही. शिवसेनेने शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिला या माध्यमांनी चालवलेल्या बातम्या आहेत. आमचा अंतिम निर्णय होईल आणि सोमवारी १६ जानेवारीॉ रोजी होणार आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी महाविकासआघाडीचा उमेदवार जाहीर करू. नागपूरवरही चर्चा होणार आहे. दोन्ही उमेदवार महाविकास आघाडी म्हणून लढतील.

महाराष्ट्रातील पाचही जागी महाविकास आघाडी जिंकेल अशी स्थिती आहे. बेईमानी करून दुसऱ्यांची घरं फोडणाऱ्या भाजपाचा खरा चेहरा पदवीधरांच्या, शिक्षकांच्या लक्षात आला आहे. त्यामुळे या दोन्ही निवडणुकांमध्ये लोक भाजपाला त्यांची जागा दाखवतील, असेही ते म्हणाले.
पैशांच्या भरवशावर, सत्तेच्या जोरावर घरं फोडण्याचं पाप भाजपाने केले. त्याचे परिणाम भाजपाला भोगावे लागतील, असा गर्भित इशाराही नाना पटोलेंनी भाजपाला दिला.

दरम्यान, नाना पटोले यांनी नागपुरात बोलताना या बंडखोरीवर सडकून टीका करताना ते म्हणाले, डॉ. सुधीर तांबे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती. त्यांनी अर्ज न भरता मुलाला अर्ज भरायला लावला. ही पक्षासोबत फसवेगिरी आहे. तर सत्यजीत तांबे यांनी आपण भाजपाचा पाठिंबा घेणार असल्याचे विधान केले. तांबे पिता-पुत्रांनी पक्षासोबत मोठा दगाफटका केला आहे, अशी संतप्त प्रतिक्रियाही व्यक्त केली.

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसने एबी फॉर्म दिला असताना देखील डॉ. सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. तेथे अपक्ष म्हणून त्यांचे पुत्र सत्यजीत तांबे यांनी अर्ज भरला. भाजपाने या निवडणुकीत उमेदवार दिलेला नाही. इकडे सत्यजीत तांबे अपक्ष नामांकन दाखल करतात आणि भाजपाचा पाठिंबा मागतात. याचा अर्थ हे सर्व आधी ठरलेले होते. हा धोका पक्ष विसरणार नाही आणि ही निवडणूक काही सामान्य निवडणूक नाही. या निवडणुकीत पदवीधर लोक मतदार आहेत आणि ते काही मूर्ख नाहीत. त्यांनाही कळते की दगाफटका करणाऱ्यांसोबत यशस्वी होणार नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *