Breaking News

राज्यसभेच्या निकालानंतर शरद पवार यांच्या ‘त्या’ वक्तव्यातून नेमका कोणाला संदेश नेमके वक्तव्य कोणाला उद्देशून उध्दव ठाकरे की देवेंद्र फडणवीस?

मध्यरात्री १ वाजेपर्यत झालेल्या राजकिय नाट्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभा निवडणूकीच्या मतमोजणीला परवानगी दिली. या मतमोजणीत भाजपाच्या तिसऱ्या उमेदवाराचा विजय झाला तर शिवसेनेच्या दुसऱ्या अर्थात महाविकास आघाडीच्या चवथ्या उमेदवाराचा पराभव झाला. या निवडणूकीत महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आणि छोट्या पक्षांनी भाजपाच्या पारड्यात मतदान टाकल्याचे स्पष्ट झाले. या साऱ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना राज्यसभेच्या निकालाचा आपल्याला कोणताही धक्का बसला नसल्याचे सांगत मतांची आकडेवारी पाहिली तर सरकार चालविण्यासाठी पुरेसे संख्याबळ महाविकास आघाडीसोबत असल्याचे स्पष्ट केले.

पुण्यातील आपल्या मोदी बागेतील घरातून पुरंदरच्या दौऱ्यावर निघाले असता त्यांना प्रसारमाध्यमांनी विचारले असता ते बोलत होते.

मात्र राष्ट्रवादीचे उमेदवार प्रफुल पटेल यांना आम्ही दिलेल्या मतांच्या कोट्यापेक्षा एक मत त्यांच्याकडचे अर्थात विरोधकांकडील असल्याचे सांगत तो मतदान करणारा कोण आहे हे मला माहित असून त्या व्यक्तीने मतदान केल्यानंतर आपल्याला सांगितल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

कधी काळी माझ्यासोबत केलेले काही व्यक्ती तिकडे आहेत. त्यांना जर मी सांगितलो असतो तर त्यांनी मला नकार दिला नसता. परंतु मी कोणाला मतदान करा असे सांगितले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यसभा निवडणूकीकरीता महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुरेशी रणनीती ठरली नसल्याची कुजबूज राजकिय वर्तुळात सुरु होती. तसेच या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसने आणि काँग्रेसने फारसा पुढाकार न घेता या दोन्ही पक्षांनी फक्त आपपाल्या उमेदवारांचेच पाहिले. त्यामुळे शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराला अर्थात संजय पवार यांना पराभवाचा सामना करावा लागला.

मतदानाच्या आदल्या दिवशी एमआयएमने महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याची तयारी दर्शवित राष्ट्रवादी काँग्रेसशी चर्चेची तयारी दर्शविली. परंतु एमआयएम आणि राष्ट्रवादीत नेमकी काय चर्चा झाली? याची माहिती बाहेर आली नाही. तर मतदानाच्या दिवशी म्हणजे काल सकाळीच एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी एमआयएम काँग्रेसला मतदान करणार असल्याचे जाहिर केले. त्यानुसार काँग्रेसकडे आधीच ४४ आमदार असून तितकीच मते त्यांच्या इम्रान प्रतापगढी यांना पडली. त्यामु‌ळे एमआयएमची दोन मते गेली कुठे असा प्रश्न निर्माण होत आहे.

त्याचबरोबर जर शरद पवार यांनी या निवडणूकीसाठी पुढाकार घेतला असता तर भाजपाच्या संपर्कात असलेल्या अपक्ष आणि छोट्या पक्षाच्या आमदारांनी महाविकास आघाडीला मतदान केले असते हे ही त्यांच्या वक्तव्यातून सुचित होत आहे. परंतु या निवडणूकीसाठी पवारांनी पुढाकार घेतला नसल्याचे त्यांनीच एकप्रकारे स्पष्ट केले. परंतु आघाडीला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आणि छोट्या पक्षांनाही आपल्या जवळ खेचून ठेवण्यास शिवसेनेला अपयश आल्याचे दिसून येत आहे. या संपूर्ण घडामोडींमागे केवळ अन् केवळ शरद पवार नसल्याने शिवसेनेच्या संजय पवारांना पराभवास सामोरे जावे लागल्याचे स्पष्ट होत आहे.

शिवसेनेने लढवलेल्या सहाव्या जागेसाठी मतांची संख्या कमी होती. तिथे आमचा फरक वाढत होता. पण धाडस करत प्रयत्न केला. यामध्ये अपक्षांची संख्या भाजपाकडे अधिक होती पण दोघांनाही पुरेशी नव्हती. त्यामुळे भाजपाला आम्हाला पाठिंबा देणारे जे इच्छुक होते त्यांना आपल्या बाजूने घेण्यासाठी भाजपाने जी कारवाई केली त्यामध्ये त्यांना यश आले. त्यामुळे हा फरक पडला आहे. आघाडीच्या एकंदर संख्येप्रमाणे त्यांना मतदान झाले आहे. यामध्ये वेगळे काही नाही. मान्य केले पाहिजे की देवेंद्र फडणवीस यांना विविध मार्गांनी माणसे आपलीशी करण्यात यश आल्याची कबुलीही त्यांनी यावेळी दिली.

सरकार चालवण्यासाठी जे बहुमत आहे, त्यामध्ये काही धक्का लागलेला नाही. राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस यांच्या एकाही मताला धक्का बसलेला नाही. अपक्ष आमदारांमध्ये या गमती झालेल्या आहेत. ते अधिकचे मत शिवसेनेला जाणार नव्हते. ते आमच्या विरोधकांच्या कोट्यातील होते. त्यांनी मला सांगून राष्ट्रवादीला दिले. तिथे असे अनेक लोक आहेत ज्यांनी मी शब्द टाकला तर त्यांची नाही म्हणायची तयारी नसते. पण मी त्याच्यात पडलो नाही असेही त्यांनी यावेळी जाणीवपुर्वक सांगितले.

रात्री जी हरकत घेण्यात आली रडीचा डाव होता. राज्यसभेच्या निर्मितीच्या नियमानुसार मतदाराने पक्षाच्या नेतृत्वाला मत दाखवायचे असते. त्यामुळे जर कोणी नाना पटोले आणि जयंत पाटील यांना मत दाखवले तर यामध्ये बेकायदेशीर काही नाही. याबाबत निवडणुक आयोगाने निर्णय दिला. पण निकाल येण्यासाठी चार तास उशीर झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या साऱ्या वक्तव्यावरून शरद पवार यांनी नेमका कोणाला इशारा दिला यावरून संभ्रम निर्माण होत आहे. एकाबाजूला त्यांनी शिवसेनेला सूचक इशारा दिला की, फडणवीस यांना संकेत दिले यावरून राजकिय वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली आहे.

Check Also

एमआयएमचा पाठिंबा, त्यावर भाजपाची टीका तर भास्कर जाधवांचे प्रत्युत्तर भाजपाची बी टीम, सी टीम कोण अख्ख्या देशाने पाहिलंय

राज्यसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अखेर एमआयएमने आपल्या दोन आमदारांचा पाठिंबा अखेर काँग्रेसला जाहिर केला. तत्पूर्वी एमआयएमने …

Leave a Reply

Your email address will not be published.