Breaking News

ट्विट राऊतांचे पण नाव घेतले शरद पवारांचे यावरून मंत्री भुसे आणि अजित पवारांमध्ये रंगली खडाजंगी राष्ट्रवादीच्या आमदारांचे वेलमध्ये उतरत आंदोलन...

विधानसभेत प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर मंत्री शासकिय कागदपत्रे सभागृहात सादर केल्यानंतर मंत्री दादाजी भुसे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटचा उल्लेख करत ४८ अन्वये निवेदन करण्यास सुरवात केली. पण संजय राऊत यांच्या आरोपांना आव्हान देण्याच्या नादात मंत्री दादाजी भुसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वसर्वा शरद पवार यांचे नाव घेतल्याने अजित पवार आणि दादाजी भुसे यांच्यात चांगलीच खडाजंगी रंगली. अखेर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जे आक्षेपार्ह असेल ते कामकाजातून काढून टाकण्यात येईल असे आश्वासन दिले त्यानंतर हा वाद संपुष्टात आला.

सभागृहात निवेदन करताना मंत्री दादाजी भुसे यांनी संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटच्या माध्यमातून केलेले आरोपाची कोणत्याही यंत्रणेमार्फत चौकशी करावी आणि त्यात जर तथ्य आढळले आणि ते सिध्द झाले तर मंत्री पदाचाच नव्हे तर राजकिय जीवनाचा राजीनामा देईन असे खुले आव्हान संजय राऊत यांना दिले.

तसेच आम्हाला गद्दार संबोधणारे संजय राऊत हे स्वतः महागद्दार असून आमच्याच मतांवर राज्यसभेत खासदार म्हणून निवडूण गेले. आता त्यांनी आम्हाला शिकवू नये असे सांगत त्यांनी केलेले आरोप हे मालेगांव येथील जनतेचा अपमान असून त्यांनी मालेगांव वासियांच्या भावनांचा अपमान केला. संजय राऊत हे भाकरी खातात मातोश्रीची आणि चाकरी करतात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आदरणीय शरद पवार साहेबांची असे विधान केले.

या वक्तव्यावर सभागृहात उपस्थित असलेले विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मंत्री भुसे यांच्या शरद पवारांच्या नावाचा केलेल्या उल्लेखावर आक्षेप घेतला. तसेच मंत्री भुसे यांनी काय भूमिका मांडावी आणि काय नाही हा त्यांचा अधिकार आहे. मात्र आमचे राष्ट्रीय नेते शरद पवार यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुरु मानत असताना त्यांचे या सभागृहात नाव घेणे चुकिचे आहे. त्यामुळे भुसे यांनी केलेले वक्तव्य कामकाजातून काढण्याची मागणी केली.

त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जे असेल ते तपासून त्यातील आक्षेपार्ह असेल ते कामकाजातून काढण्यात येईल असे आश्वासन राष्ट्रवादीच्या सदस्यांना दिले.

मात्र तरीही राष्ट्रवादीच्या सदस्यांचे समाधान न झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत जमा होत पन्नास खोके माजलेत बोके… पन्नास खोके, एकदम ओके.. दादा भुसे मुर्दाबाद…दादा भुसे यांचे करायचे काय, खाली डोके वर पाय… अशा घोषणा देत राष्ट्रवादी आणि घटक पक्षांच्या मदारांनी वेलमध्ये उतरत जोरदार आंदोलन केले.

या गोंधळातच सत्ताधारी पक्षाकडून चार ते पाच विधेयके मंजूर केले. विधेयके मंजूर केल्यानंतर पुन्हा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भुसे यांनी केलेल्या विधानाबाबत एक तर दिलगिरी व्यक्त करावी किंवा ते विधान मागे घेत असल्याचे जाहिर करावे अशी मागणी केली. आम्ही विषय संपवायला तयार असल्याचे सांगितले.

त्यावर दादाजी भुसे हे बोलायला उभे रहात म्हणाले की, मी शरद पवार यांच्याबद्दल काहीही आक्षेपार्ह बोलेलो नाही. त्यामुळे फक्त भाकरी मातोश्रीची खातात आणि चाकरी आदरणीय शरद पवार यांची करतात असे वक्तव्य केले. त्यामुळे त्यात काही आक्षेपार्ह असेल तर ते अध्यक्ष महोदयांनी तपासून त्यावर योग्य निर्णय घ्यावा अशी विनंती केली.

त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई हे दादा भुसे यांच्या मदतीला धावून येत संजय राऊत हे महागद्दार आहेत. त्यांनी राजीनामा द्यावा असे सांगत शरद पवारांचा कोणताही अवमान करण्याचा आमचा कोणाचाही उद्देश नाही. त्यामुळे त्यांनी टीका केली ती संजय राऊत यांच्यावर केली.

त्यावर जयंत पाटील यांनी भूमिका मांडली. अखेर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिवसभराचे कामकाज संपण्याआधी जे काही आक्षेपार्ह असेल ते तपासून काढण्यात येईल असे आश्वासन दिले. त्यानंतर हा वाद संपुष्टात आला.

Check Also

गडकरींकडून आदर्श आचारसंहितेचा भंग, गडकरी व आमदार मोहन मतेंवर गुन्हा नोंदवा

भारतीय जनता पक्ष सर्वकायदे धाब्यावर बसवून सातत्याने आचारसंहितेचा भंग करत आहे. भारतीय जनता पक्षाचे नागपूर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *