Breaking News

शिवसेनेच्या विरोधानंतरही जैतापूर प्रकल्प होणार? फ्रांसच्या राजदूताचे मोठे वक्तव्य जैतापूर प्रकल्पामुळे भारतीय व फ्रेंच उद्योगांमधील सहकार्य अधिक वाढेल- जॉन मार्क सेर शॉर्ले

मराठी ई-बातम्या टीम
कोकणात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा-शिवसेना सरकारने जैतापूर येथे अणु ऊर्जा प्रकल्प उभारण्याची घोषणा केली. परंतु या प्रकल्पामुळे कोकणातील पर्यावरणास हानी पोहचत असल्याने शिवसेनेने या प्रकल्पाला विरोध केला. शिवसेनेच्या या विरोधामुळे जैतापूर प्रकल्प थंड बसत्यात गेला होता. मात्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या उपस्थित फ्रांसचे नवनियुक्त वाणिज्यदूत राजदूत जॉन मार्क सेर शॉर्ले यांनी यासंदर्भात मोठे वक्तव्य केल्याने जैतापूरचा प्रकल्प अद्याप रद्द करण्यात आले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
यासंदर्भात फ्रांसचे नवनियुक्त वाणिज्य दूत जॉन मार्क सेर शॉर्ले यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेत अनेक गोष्टींवर चर्चा केली. चर्चेनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, फ्रान्‍सच्या सहकार्याने होत असलेला जैतापूर येथील अणुऊर्जा प्रकल्प हा जगातील सर्वात मोठा अणुऊर्जा निर्मिती प्रकल्प असून या प्रकल्पामुळे भारतीय व फ्रेंच उद्योगांमधील सहकार्य अधिक वाढेल.
जैतापूर येथील अणुऊर्जा प्रकल्पामुळे कोकणातील भौगलिक पर्यावरणासह समुद्री पर्यावरणासही बाधा निर्माण होणार आहे. यासंदर्भात कोकणातील अनेक पर्यावरण प्रेमींनी त्यासाठी आंदोलनही केली. तसेच गतसरकारच्या काळात जैतापूर येथील नियोजित प्रकल्पाच्या ठिकाणी एकही वाहन पोहचू देणार नसल्याचा इशारा शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी त्यावेळी दिला होता. मात्र आता विरोध करणारी शिवसेनाच राज्यात सत्तेवर असताना फ्रांसचे वाणिज्यदूत मुंबईत राज्यपालांच्या भेटीनंतर जैतापूर प्रकल्पांबाबत वक्तव्य करतात यावरून हा प्रकल्प राज्य सरकारकडून अद्याप रद्द करण्यात आलेला नसल्याचे स्पष्ट होत आहे.
शॉर्ले यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची सोमवारी राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. फ्रांसने सन २०२२ साली भारतात आपला सांस्कृतिक महोत्सव ‘बॉनजो इंडिया’ आयोजित करणार असून त्यानंतर भारत देखील फ्रान्‍स मध्ये ‘नमस्ते फ्रांस’ या भारताच्या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करणार असल्याचे सांगत करोना काळात भारतातील फ्रेंच कंपन्यांनी एकही कामगार कपात केली नाही असे वाणिज्यदूतांनी राज्यपालांना सांगितले.
राफाएल सहकार्यामुळे भारत – फ्रान्‍स संबंध अधिक मजबूत झाले असून फ्रेंच कंपनी दासाऊँ एव्हिएशनच्या सहकार्याने नागपूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत व्यवसाय प्रशिक्षण देण्याचे कार्य सुरु असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले.
राज्यातील २२ सार्वजनिक विद्यापीठांचे कुलपती या नात्याने फ्रान्‍समधील विद्यापीठांनी राज्यातील विद्यापीठांशी सहकार्य करण्याचा प्रस्ताव केल्यास आपण त्याचे स्वागत करू, असे राज्यपालांनी वाणिज्यदूतांना सांगितले.

Check Also

अमित शाह यांची घोषणा, सत्तेवर येताच संपूर्ण देशात समान नागरी कायदा

संपूर्ण देशात समान नागरी कायदा, एकाच वेळी लोकसभा-विधानसभा निवडणुका, ७० वर्षावरील प्रत्येक नागरीकास पाच लाखापर्यंत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *