Breaking News

मनसेने जारी केले पुरंदरेंसह सात इतिहासकारांचे “ते” पत्र, हे माहित नव्हते का? पवारांनी माफी मागावी केली मागणी

गुढी पाडव्याच्या मनसे मेळाव्यात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधत शरद पवार हे कधीच शिवाजी महाराजांचे नाव घेत नाहीत, कारण त्यांना हातची मुस्लिम मते जातील अशी भीती वाटते असा गंभीर आरोप केला. त्यास उत्तर देताना शरद पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची मांडणी फुले-शाहू-आंबेडकरांनी केल्याने मी त्यांची नावे घेत असल्याचे स्पष्टीकरण देत सहा महिन्यात एखादं वक्तव्य करत पुन्हा गायब होणारे राज ठाकरेंना फारसं गांभीर्याने घेत नसल्याची खोचक टीका केली. त्याचबरोबर पवार यांनी भाजपाबद्दल एकही शब्द उचारला नसल्याचे सांगत ते कोणाची तरी स्क्रिप्ट वाचत होते. असा टोला लगावला.

त्यानंतर राज ठाकरे यांच्यावर झालेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी राज ठाकरे यांची ठाण्यात उत्तर सभा झाली. त्या सभेत त्यांनी शरद पवारांसह अनेकांना उत्तर दिले. त्यानंतर पुन्हा शरद पवार यांनी त्यांच्यावरील टीकेला उत्तर देताना जेम्स लेन्स याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल लिहीलेले पुस्तक हे बाबासाहेब पुरंदरे यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे लिहील्याचे त्यानेच त्यांच्या पुस्तकात लिहीले. त्यामुळे आपण पुरंदरेंवर टीका करत असल्याचे स्पष्ट केले. त्यावर मनसेने जेम्स लेनने लिहिलेल्या पुस्तकातील त्या आक्षेपार्ह मजकूराबाबत ऑक्सफर्ड प्रेसला राज्यातील पुरंदरे यांच्यासह सात इतिहासकारांनी घेतलेल्या आक्षेपाचे पत्र जाहीर केले.

हे पत्र जाहीर करत मनसे शरद पवारांना हे पत्र माहित नव्हते का असा सवाल करत आता पवारांनी संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी मनसेचे सचिव संदीप देशपांडे यांनी केली.

दरम्यान, यावर आता मनसेकडून १० नोव्हेंबर २००३ रोजी ऑक्स्फर्ड युनिव्हर्सिटी प्रेसला लिहिलेलं एक पत्र जाहीर करण्यात आलंय. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी हे पत्र समोर आणलं असून त्यासंदर्भात माध्यमांशी बोलताना संदीप देशपांडे यांनी शरद पवारांवर निशाणा साधला. मला वाटतं हे पत्र स्वयंस्पष्ट आहे. जे काल शरद पवार म्हणाले होते की बाबासाहेब पुरंदरेंनी याबाबत कुठेही काही म्हटलं नाही, त्यावर हे पत्र स्वयंस्पष्ट आहे. त्यांच्या भावना या पत्रात बाबासाहेबांनी व्यक्त केल्या आहेत. या पत्राची कल्पना १०० टक्के राष्ट्रवादी काँग्रेसला आहे. तरीही भांडणं लावण्याचा प्रयत्न केला गेला. राज ठाकरे भाषणात जे म्हणाले की राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून जातीजातींत भांडणं लावण्याचं काम करण्यात आलं आहे, त्याचा ढळढळीत पुरावा या पत्रापेक्षा दुसरा कुठला असू शकत नाही.

एका शिवप्रेमीने आपल्याला हे पत्र पाठवल्याचं देशपांडे म्हणाले.

या पत्रात नमूद करण्यात आलेला मजकूर देखील त्यांनी वाचून दाखवला. “ज्यांच्यावर कोट्यवधी भारतीयांचं प्रेम आहे, त्यांच्याबद्दलचे निराधार आरोप आम्ही सहन करणार नाही. जेम्स लेन यांनी त्यांच्या पुस्तकात हेच केलं आहे. हे पुस्तक तुमच्याकडून प्रकाशित होत आहे. शिवाजी महाराज आणि दादोजी कोंडदेवांविषयी जेम्स लेननं जे विधान केलंय, ती त्याच्या घाणेरड्या मनोवृत्तीची उत्पत्ती आहे. त्यामुळे प्रकाशक आणि लेखकांनी २५ नोव्हेंबर २००३ पर्यंत कोट्यवधी भारतीयांच्या भावना दुखावल्याबद्दल माफी मागावी आणि हे पुस्तक भारत आणि परदेशातूनही मागे घ्यावं. जर प्रकाशक आणि लेखकानं असं काही केलं नाही, तर भारत सरकारने या पुस्तकावर बंदी घालावी आणि त्यांच्याविरोधात योग्य ती कारवाई करावी, अशी विनंती आम्ही करू असे त्या पत्राद्वारे खासदार प्रदीप रावत, बाबासाहेब पुरंदरे, डॉ. जयसिंग पवार, इतिहासकार निनाद बेडेकर, डॉ.सदाशिव शिवदे, डॉ.वसंत मोरे, इतिहासकार जी.बी.मेहंदळ‌े यांनी केली. तसेच या सर्वांच्या त्या पत्रावर सह्या आहेत.

हे पत्र त्यांनी बघावं. जर त्यांना वाटलं की चूक झाली आहे, तर महाराष्ट्राची त्यांनी माफी मागितली पाहिजे असेही ते म्हणाले.

Check Also

अतुल लोंढे यांची खोचक टीका, … ४०० पारच्या पोकळ गप्पा मारणा-यांचे २०० चे वांदे

भारतीय जनता पक्षाने ‘अब की बार ४०० पार’चा जो नारा दिला आहे, तो केवळ हवा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *