Breaking News

पडळकरांच्या आरोपानंतर अजित पवार म्हणाले… नेमकी बाजू काय हे जाणून घेणार पण प्रत्येकाला सुरक्षा पुरविणे राज्य सरकारची जबाबदारी

मराठी ई-बातम्या टीम

विधान परिषदेतील भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी एक व्हिडिओ जारी करत आपल्यावर सांगलीचे पालक मंत्री पाटील आणि पवार यांच्याकडून जमावाच्या माध्यमातून जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक आरोप केल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, हे गंभीर असून राज्यातील प्रत्येकाला सुरक्षा पुरविणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. मात्र वस्तुस्थिती काय याची माहिती घेणार असल्याचे स्पष्ट केले.

झालेली घटना गंभीर असून कोणावरही अशा प्रकराचा हल्ला व्हायला नकोय. यासंदर्भात मी महाराष्ट्र पोलिस महासंचालक संजय पांडे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याशी बोलणार आहे. त्यांची एकबाजू समोर आली असून दुसरी बाजू काय आहे याची माहिती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मी आता मुंबईला जात असून तेथे गेल्यावर या सर्वांशी बोलणार असून झालेल्या घटनेबाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगणार आहे. तसेच राज्यातील प्रत्येकाला सुरक्षा पुरविण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. त्यामुळे असे काही घडले असेल तर दुसरी बाजू काय हे ही पाहिले पाहिजे असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच हल्लेखोर हे कोणत्याही राजकिय पक्षाचे नसतात असेही त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, भाजपाचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर हे सातत्याने पवार कुटुंबियांच्या विरोधात आरोप करत असतात. तसेच २०१९ ला झालेल्या विधानसभा निवडणूकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या विरोधात आपला उमेदवारी अर्ज भरला होता. त्यावेळी अजित पवारांनी विरोधकांचे डिपॉझिट होईल अशी घोषणा केली होती. त्याप्रमाणे अजित पवारांनी विक्रमी मताधिक्क मिळवित विधानसभा निवडणूकीत विजय मिळविला. तर त्यांचे प्रतिस्पर्धी गोपीचंद पडळकर यांचे डिपॉझिट जप्त झाले.

त्याचबरोबर धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्नावरून पडळकरांकडून सातत्याने शरद पवारांवर आरोप करण्यात येत आहेत. परंतु आतापर्यंत पडळकर यांनी सांगली जिल्ह्याचे पालक मंत्री जयंत पाटील यांच्यावर कधीच जाहीररित्या आरोप केलेले नव्हते. मात्र यावेळी त्यांनी पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जिल्ह्याचे पालक मंत्री जयंत पाटील यांच्यावर आरोप केला. त्याचबरोबर त्यांनी जमावाच्या माध्यमातून हत्येचा कट रचल्याचाही आरोप त्यांनी केला.

Check Also

आणि वडेट्टीवारांनी उडविली पडळकरांची खिल्ली, “नया नया पंछी ज्यादा फडफड…” वडेट्टीवार पडळकरांचा ओबीसीवरून नवा वाद

मराठी ई-बातम्या टीम ओबीसी आरक्षणावरील सर्वोच्च न्यायालयात उद्या सोमवारी सुणावनी असून या पार्श्वभूमीवर ओसीबी समाजाचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *