Breaking News

पहाटेच्या शपथविधीवरून जयंत पाटलांकडून थेट “शरद पवारां”कडे बोट नंतर “कयास”चे स्पष्टीकरण अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांचा बोलण्यास नकार

राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात औट घटकेचे सरकार स्थापन झाले. त्यासाठी भल्या पहाटेच फडणवीस-पवार यांचा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. या शपथविधीवरून आज पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वक्तव्य करत त्या पहाटेच्या शपथविधी मागे आमचे प्रमुख नेते शरद पवार यांची खेळी होती असे वक्तव्य केले. त्यामुळे त्यानंतर राजकिय गदारोळ उडाला. त्यानंतर खेळी नव्हे तर कयास असल्याचे वक्तव्य केल्याचा खुलासा केला. मात्र जयंत पाटील यांच्या वक्तव्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना जयंत पाटील म्हणाले, पहाटेचा शपथविधी ही शरद पवारांची राजकीय खेळी असू शकते. तसेच त्यांनी एखादी गोष्ट केली की ती गोष्ट समजायला वेळ लागतो असे स्पष्ट करत या शपथविधी मागे शरद पवारच असल्याची कबुलीच यावेळी दिली.
जयंत पाटलांच्या या विधानानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. यावर विविध राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया येत असताना जयंत पाटील यांनी आपल्या विधानावरून घूमजाव केले.

त्यानंतर पुन्हा प्रसारमाध्यमांशी बोलताना जयंत पाटील म्हणाले, पहाटेचा शपथविधी ही शरद पवारांची खेळी होती, असं मी बोललो नाही. तो माझा कयास होता. शरद पवार आम्हाला विचारून राजकीय पावलं टाकत नाहीत अशी सारवासारवही यावेळी केली.

संबंधित विधानावर स्पष्टीकरण देताना जयंत पाटील म्हणाले, पहाटेचा शपथविधी ही खेळी होती, असं मी बोललो नाही. तो एक अंदाज आहे. तो मझा कयास आहे. शरद पवार आम्हाला विचारून पावलं टाकत नाहीत. त्यांनी आम्हाला विचारून निर्णय घ्यावेत, असं आम्हाला अजिबात वाटत नाही. आम्ही फार ज्युनिअर आहोत. पण शरद पवारांनी एखादी गोष्ट केली तर त्याचा अर्थ कळण्यास बराच वेळ लागतो. त्यामुळे त्या काळातला घटनाक्रम बघितला तर, त्या घटनेचा फायदा नवीन सरकार स्थापन होण्यास झाला, हे नाकारून चालणार नाही. शरद पवारांनी ते जाणूनबुजून केलं, असं मी म्हणालो नाही. पण त्या घटनेचे फायदे काय झाले? हे मी त्यांना सांगत होतो असा खुलासाही केला.

देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीवर भाष्य करताना जयंत पाटील म्हणाले, मला वाटत नाही की अजित पवार काही बोलले असतील. पण त्यावेळी राज्यात (२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर) राष्ट्रपती राजवट लागू होती. राष्ट्रपती राजवट उठवल्याशिवाय काही पर्याय नव्हता. त्या अनुषंगाने केलेली ही एक खेळी असू शकते. त्यामुळे मला वाटत नाही की त्याला यापेक्षा जास्त काही महत्त्व आहे. त्यावेळी अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यांना आज महत्त्व नाही. त्यानंतर अजित पवार यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री म्हणून काम केले. या काळात त्यांनी स्पष्टपणे कारभार केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला नाही. आता शिवसेनेचे आमदर फुटल्यामुळे सरकार कोसळले. पण राष्ट्रवादी काँग्रेसने उद्धव ठाकरेंना शेवटपर्यंत ठामपणे साथ दिली, हे नाकारता येणार नाही असा दावाही केला.

जयंत पाटील यांच्या वक्तव्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, मी यापूर्वीच स्पष्ट केले मला वाटलं तर मी त्या शपथविधीबाबत बोलेन. तुम्ही कसेही विचारा तुम्ही विचारले म्हणून मी सांगणार नाही. आता या गोष्टीला अडीच वर्षे झाली. ते सरकार जाऊन नवं सरकार आलं. आता ते सरकार जाऊन नवं सरकार आलं. सगळे जण काम करतायत.

तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत विचारले असता त्यांनी या शपथविधीप्रश्नी उत्तर देण्यास टाळत महाराष्ट्रातील जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *