Breaking News

नारायण राणेंचा पुन्हा सूचक शब्दातून इशारा, माझं कोणीच काही करु शकत नाही यात्रा पुन्हा सुरु होणार असल्याचे सांगत त्यांना एकटा पुरून उरलोय

मुंबई: प्रतिनिधी

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबद्दल विधान केल्याप्रकरणी पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर जामिनावर बाहेर आलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज पुन्हा एकदा शिवसेना आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता पुन्हा थेट इशारा दिला. माझं कोणीच काही करू शकत नाही. तुम्हालाही मुलं-बाळं नाहीत का असे वक्तव्य करत मी तुम्हा सगळ्यांना पुरून उरलोय. शिवसेना जी काही वाढली त्यात माझाही मोठा सहभाग होता. त्यावेळी आताचे आहे म्हणणारेही नव्हते असे सांगत मी १७ सप्टेंबरनंतर उत्तर देणार असल्याचा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिला.

जुहू येथील त्यांच्या निवास्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मी जे काही त्या दिवशी काय बोललो हो? असा सवाल करत मी ते वाक्य पुन्हा बोलणार नाही. मी काही जे बोललो ते देशभक्त म्हणून बोललो. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देशाचा सुवर्ण महोत्सव आहे की रौप्य महोत्सव आहे याची माहिती नसल्याने माझ्यातील देशप्रेमी जागा झाला म्हणून ते बोलल्याचे त्यांनी सांगितले.

शिवसेना भवनाबद्दल मध्यंतरी प्रसाद लाड यांनी काही वक्तव्य केले. त्यावर मुख्यमंत्री काय बोलले याचीही माहिती घ्या. ज्यांनी बोललो म्हणून माझ्यावर कारवाई केली त्यांनी तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल काय बोलले? चपलांनी मारायला पाहिजे असे बोलले. देशाच्या गृहमंत्री अमित शाह यांच्याबद्दल काय बोलले याची माहिती घ्या. अशा निर्लज्ज व्यक्तीला पवारांनी मुख्यमंत्री केल्याचे ते म्हणाले.

आता माझ्याकडे महाड न्यायालयाचे निकाल पत्र आहे. आणि आजच मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल आला असून त्याचीही प्रत माझ्याकडे आली आहे. दोन्ही न्यायालयाचे निकाल माझ्याबाजूने आलेले आहेत. त्यामुळे आता मी १७ तारखेपर्यत काहीही बोलणार नसून त्यानंतर मी उत्तर देणार असल्याचे सांगत ते पुढे म्हणाले की, दिशा शालियनच्या हत्येला कोण जबाबदार? त्या पूजा चव्हाणच्या बाबतही तेच, याशी संबधित मंत्र्यांना आत घालविण्यासाठी आम्ही कायदेशीर मार्गाचा अवलंब करणार असून त्यांना आत घालविल्याशिवाय स्वस्थ बसणार नसून त्याचा कायदेशीर मार्गाने पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मी जर गँगस्टर होतो तर मग मला शिवसेनेने मुख्यमंत्री का केले? असा सवाल करत शिवसेनेत मग सगळे गँगस्टर आहेत असे म्हणायचे का? असा प्रतिसवालही त्यांनी केला.

Check Also

पंतप्रधान मोदी म्हणाले की, मुंबई हे केवळ स्वप्नांचे शहर नाही तर… राजभवनावरील कार्यक्रमात बोलताना भविष्यकालीन योजनांचा सुतोवाच

पुण्यातील देहुमध्ये संत तुकारामांच्या शिळा मदिराचं लोकार्पण केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईतील राजभवनला पोहोचले. राजभवन …

Leave a Reply

Your email address will not be published.