Breaking News

सरन्यायाधीश लळीत यांच्या सत्कारावरून जयंत पाटील यांनी टोचले मुख्यमंत्र्यांचे कान सरकार वैधतेची गंभीर सुनावणी सुरु असताना सरन्यायाधीशांसोबत बसणे संकेतांना धरुन नाही

महाराष्ट्राचे सुपुत्र असलेले यु.यु.लळीत हे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पदी नियुक्ती झाल्याबद्दल सुरुवातीला राजभवनावर होणारा सत्कार सोहळा ऐनवेळी ताज हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आला. मात्र या सत्कार सोहळ्यावरून विरोधकांनी मुख्यमंत्री आणि न्यायपालिकेच्या या वर्तनाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

यापूर्वीही सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून महाराष्ट्राच्या सुपुत्रांची नियुक्ती झाली. मात्र ते निवृत्त होण्यापूर्वी कोणाचा राज्य सरकारकडून असा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला नाही. राज्य सरकारऐवजी स्थानिक बार असोसिएशनकडूनही अशा पध्दतीचे सत्कार सोहळे आयोजित करण्यात आले. नागपूरचे सुपुत्र बोबडे यांचाही सत्कार नागपूरवासियांनी केला. मात्र त्यांची निवृत्ती झाल्यानंतर आणि तेथील बार असोसिएशनकडून तो सत्कार करण्यात आला होता.

मात्र सद्यपरिस्थितीत राज्यात विराजमान असलेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्याच वैधतेबाबतचा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या पात्रतेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिकेवर सुनावणी सुरु आहे, अशा परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयाच्या सर न्यायाधीशांचा सत्कार सोहळा राज्य सरकारने करणे आणि त्यास सरन्यायाधीशांनी जातीने उपस्थित राहणे हे कोणत्या नैतिकतेला धरून आहे असा सवाल सर्वस्थरातून करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कान टोचले आहेत.

याबाबत जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर सुनावणी सुरू असताना मुख्यमंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांसोबत एका व्यासपीठावर बसणे हे संकेतांना धरून नाही अशा शब्दात मुख्यमंत्र्यांचे कान टोचले.

सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सरकारच्या वैधतेची गंभीर सुनावणी सुरु आहे, असे असताना मुख्यमंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांसोबत एका व्यासपीठावर बसणे याबाबतचा आक्षेप असल्याचेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये व्यक्त केला.

Check Also

अतुल लोंढे यांची खोचक टीका, … ४०० पारच्या पोकळ गप्पा मारणा-यांचे २०० चे वांदे

भारतीय जनता पक्षाने ‘अब की बार ४०० पार’चा जो नारा दिला आहे, तो केवळ हवा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *