Breaking News

भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी दिली कबुली, पंकजा मुंडेंने बदनामी करणारे पक्षातच.. बीडमधील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बावनकुळे यांची स्पष्टोक्ती

२०१९ च्या विधानसभा निवडणूकीत भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर मुंडे यांच्या पराभवामागे कोण याविषयीच्या चर्चेला मोठ्या प्रमाणावर सुरुवात झाली. त्यानंतर राज्यात झालेल्या विधान परिषद आणि राज्यसभेच्या निवडणूकीत आणि सत्तांतरानंतर शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात पंकजा मुंडे यांना स्थान मिळणार असल्याच्या चर्चा सातत्याने होत राहील्या. मात्र पंकजा मुंडे यांचे नाव प्रत्येकवेळी डावलण्यात आले. परंतु आता पंकजा मुंडे या भाजपामधून बाहेर पडणार असल्याच्या चर्चेला जोर चढू लागलेला असतानाच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंकजा मुंडे यांना बदनाम करणारा गट हा पक्षातच असल्याची स्पष्ट कबुली आज शनिवारी दिल्याने भाजपामध्ये एकच खळबळ उडाली.

बीडमधील एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रसार माध्यमांनी याबाबत बावनकुळे यांना विचारणा केली असता त्यावर ते बोलत होते.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, भाजपामध्येच पंकजा मुंडे आणि पक्षाला बदनाम करणारा एक गट आहे. तेच ही बदनामी करत आहेत. कालच्या माझ्या संपूर्ण प्रवासात पंकजा मुंडे माझ्यानंतरच बोलल्या. मी पंकजा मुंडेंना प्रथम स्थान दिलं. ती माझी जबाबदारी आहे, मी काही उपकार केलेले नाहीत.

पंकजा मुंडे आमच्या नेत्या आहेत. त्या आमच्या राष्ट्रीय सचिव आहेत. त्यामुळे त्यांना नंतर बोला, मी आधी बोलतो हा त्यामागील आशय होता, असेही चंद्रशेखर बावनकुळेंनी नमूद केलं.

पंकजा मुंडे खरंच नाराज आहेत? या प्रश्नावर चंद्रशेखर बावनकुळेंनी याआधीही प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते, पंकजा मुंडे माझ्याशी रोज बोलतात. माझी आणि त्यांच्याशी परवाच चर्चा झाली. परवा त्यांची प्रकृती ठिक नव्हती. कधीकधी व्यक्तिगत अडचणी येत असतात. एखाद्या कार्यक्रमाला एखादा नेता उपस्थित राहू शकत नाही. प्रत्येक नेत्याची व्यस्तता वेगळी असते. आज देवेंद्र फडणवीस बीडमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून गेले आहेत. त्या कार्यक्रमाला एखादा आमदार नसेल तर त्याने दांडी मारली असे म्हणायचे का? एक नेता गेल्यानंतर दुसरा नेता हजर राहणे गरजेचे आहे का? एकाच कार्यक्रमाला चार-पाच नेत्यांना अडकवून कशाला ठेवायला हवे. त्यापेक्षा वेगवेगळे कार्यक्रम केलेले कधीही चांगले. कोणताही वेगळा अर्थ काढू नये. पंकजा मुंडे या नेत्या आहेत. त्यांचेही वेगळे कार्यक्रम आहेत, असेही ते म्हणाले होते.

यावेळी प्रसारमाध्यमांनी आदित्य ठाकरे यांच्या टीकेबाबत विचारले असता चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, तुमच्या रक्तात बेईमानी आहे. बेईमानी करून तुम्ही राज्य मिळवले होते. त्यामुळे खरे सत्य काय आहे हे निकाल आला की कळेलच. घटनाबाह्य सरकार उद्धव ठाकरे यांनी बनवले होते. भाजपाच्या युती सोबत निवडून आले. एवढीच धमक होती तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकार बनवताना आमदारकीचे राजीनामे देऊन पुन्हा निवडणुकीला सामोरे जायला हवे होते. निवडून येऊनच सरकार बनवायचे होते, असे आव्हानच दिले.

निवडणूक आयोगाकडे प्रकरण सुरू आहे. त्यामुळे निवडणूक आयोग एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे कागदपत्रांची मागणी करत असेल तर आयोग निर्णय करेल आणि तो निर्णय मान्य केला पाहिजे. आदित्य ठाकरेंनी एवढी घाई करू नये. सत्याचा विजय होईल. परंतु, सत्य काय आहे हे १२ कोटी जनतेने बघितले आहे, असा उपरोधिक टोलाही आदित्य ठाकरे यांना लगावला.

Check Also

अतुल लोंढे यांची खोचक टीका, … ४०० पारच्या पोकळ गप्पा मारणा-यांचे २०० चे वांदे

भारतीय जनता पक्षाने ‘अब की बार ४०० पार’चा जो नारा दिला आहे, तो केवळ हवा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *