Breaking News

चंद्रकांत पाटलांच्या टीकेवर मंत्री बंटी पाटील म्हणाले, भाजपानेच पाठीत खंजीर खुपसला युती असतानाही शिवसेना उमेदवाराच्या विरोधात अपक्ष उमेदवार

शंकर जाधव यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली असून या निमित्ताने काँग्रेस आणि भाजपा आमने-सामने आल्याचे चित्र पहायला मिळत आहे. काँग्रेसकडून कोल्हापूर उत्तर विधानसभेसाठी जयश्री जाधव यांना उमेदवारी जाहीर केली. तर भाजपाकडून सत्यजित कदम यांना उमेदवारी जाहीर केली. यावेळी भाजपा उमेदवाराचा अर्ज भरण्यापूर्वी चंद्रकांत पाटील यांनी मंत्री सतेज बंटी पाटील यांच्यावर निशाणा साधत बंटी पाटील हे माणसं खाणारा माणूस आहे अशी खोचक टीका केली. त्यावरून सतेज पाटील यांनीही चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला प्रत्युत्तर देत म्हणाले की, या निवडणूकीच्या निमित्ताने भाजपाला संस्कारी राजकारण दाखविण्याची संधी होती. मात्र त्यांनी पोटनिवडणूक लादून राजकिय सूडबुध्दीचे राजकारण करत असल्याचे दाखवून दिल्याची खोचक टीका केली.

काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सतेज पाटील पत्रकारांशी बोलत होते. कोल्हापुरात २०१९ विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेना-भाजपा यांची युती होती. पण कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेच्या विरोधात चंद्रकांत पाटील यांनी अपक्ष उमेदवार उभे करून शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला. पराभवाचे हे शल्य शिवसैनिक विसरणार नाहीत. ही घटना कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेला माहित असल्याचे त्यांनी नमूद केले.

भाजपाच्या पायाखालची वाळू घसरत चालली असल्याने ते खालच्या पातळीवरची टीका करत आहेत. निवडणूक का लढवली याची चूक त्यांना आता लक्षात येऊ लागली आहे. त्यातूनच वैयक्तिक टीकाटिपणी करण्यास त्यांनी सुरुवात केली असल्याचे सांगत राज्यात शिवसेनेच्या सहकार्याने भाजपाचा विस्तार झाला. सत्ता आल्यावर भाजपाने शिवसेनेला वाईट वागणूक दिली. याचे साक्षीदार शिवसैनिक आहेत. ते भाजपाच्या खोट्या आरोपांना फसणार नाहीत असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

५० वर्षातील काँग्रेसचे कार्य आणि भाजपाचे पाच वर्षांचे कार्य याबाबत चंद्रकांत पाटील यांच्याशी कुठेही चर्चा करण्याची तयारी असल्याचे आव्हानही त्यांनी यावेळी दिले. कोल्हापूरची पोटनिवडणूक भाजपाने जयश्री जाधव यांना निवडून देऊन बिनविरोध करायला हवी होती. यातून भाजपाच्या संस्कारी राजकारणाचे दर्शन घडले असते. पण सूडबुद्धीचे राजकारण म्हणून पोटनिवडणूक लादली असली तरी जनता काँग्रेसच्या मागे असल्याचे त्यांनी सांगितले.

सार्वत्रिक निवडणूक असल्याप्रमाणे भाजपा शक्तीप्रदर्शन करत उत्साहाने उमेदवारी अर्ज भरत आहे. आमदार चंद्रकांत जाधव यांचं अकाली निधन झालं असल्याचे भान त्यांनी पाळलेले नाही. भाजपाची उमेदवारी आयात असल्याने कोल्हापुरातील भाजपा, संघाच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी मान्य नसल्याचेही त्यांनी सांगितले.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *