इस्लामपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रवादी परिवार यात्रेच्या सभेत पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या त्या वक्तव्यावरून सध्या बराच वाद सुरू झाला. मिटकरींच्या त्या वक्तव्याच्या निषेधार्ह ब्राह्मण महासंघानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातील कार्यालयासमोर आंदोलन करत तीव्र आक्षेप घेतला. तसेच त्यांच्या माफीची मागणी केली. भाजपाने देखील यासंदर्भात टीकेचा सूर लावला असताना अमोल मिटकरी यांनी मात्र आपण माफी मागणार नसल्याचं स्पष्ट केले. मात्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यासंदर्भात सविस्तर भूमिका मांडत तसेच, माझ्या व्यासपीठावर ते वक्तव्य झालं, असं म्हणत त्यांनी दिलगिरी देखील व्यक्त केली.
ब्राह्मण समाजाला दुखावण्याचा हेतू त्या सभेचा नव्हता. त्यांच्या वक्तव्यामुळे भावना दुखावल्या असतील तर त्याचा मला खेद वाटतोय. आमची ती भूमिकाच नव्हती. असं वक्तव्य होणं योग्य नव्हतं. त्यांच्या वक्तव्यामध्ये ब्राह्मण समाजाचा उल्लेख नाही. पण मंत्रपठण वगैरेमुळे ब्राह्मण समाजात एक भावना तयार झाली आहे. मी सर्व ब्राह्मण समाजाला विनंती करेन की आमचा तो हेतू नाही. ब्राह्मण समाजासाठी आम्हाला सर्वांनाच आपुलकीची भावना आहे. त्याबाबत आमची कुणाचीही टोकाची भूमिका नाही. माझ्या व्यासपीठावर ते भाष्य झालं, त्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करणं आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
एकदा माझ्याच मतदारसंघात आर. आर. पाटलांच्या बाबत असं भाष्य झालं. पाटील व्यासपीठावर होते. मी त्यांच्या घरी जाऊन दिलगिरी व्यक्त केली. त्याचप्रकारे आत्ता माझ्या व्यासपीठावर काही गोष्टी घडल्या. तशी भावनाच माझी नाही. त्यामुळे ब्राह्मण समाजाने गैरसमज करून घेऊ नये अशी माझी त्यांना मन:पूर्वक विनंती असल्याचेही ते म्हणाले.
काल भाषण करताना अमोल मिटकरी नेमके काय म्हणाले ?
एका ठिकाणी मी गेलो, कन्यादान होत होतं. मी म्हटलं अन्नदान ऐकलं, नेत्रदान ऐकलं, रक्तदान ऐकलं. कन्या काय दान करण्याचा विषय असतो का? म्हणे असतो ना. नवरदेव पीएचडी, नवरी एमए झाली. लग्न लावणारे महाराज म्हणत होते तुमचा हात, तुमच्या पत्नीचा हात माझ्या हातात द्या. मम भार्या समर्पयामी. मी नवरदेवाच्या कानात सांगितलं आरे येड्या, ते महाराज म्हणतायत मम म्हणजे माझी भार्या म्हणजे बायको आणि समर्पयामी म्हणजे घेऊन जा. आरारारा… कधी सुधारणार असं मिटकरी म्हणाले होते.
दरम्यान, या विधानामुळे ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचं सांगत मिटकरींनी माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात बोलताना अमोल मिटकरी यांनी माफी मागणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला.
ज्यांनी माझ्यावर आरोप केलेत, त्यांनी माझा व्हिडीओ पूर्णपणे तपासावा. मी कोणत्याही समाजाचं नाव घेतलेलं नाही. मी एका गावात कन्यादान सुरू असताना तिथे विरोध केला. कन्या हा काही दान करण्याचा विषय नाहीये. कन्यादान करत असताना स्थानिक महाराजांनी जो मंत्र उच्चार केला, त्याचा अर्थ फक्त समजावून सांगितला. यांनी त्याला वेगळा जातीय किंवा राजकीय रंग देण्याचं काम करू नये. माझ्या विधानाचा विपर्यास करण्याचं काम विरोधकांकडून होतंय. माझा पूर्ण व्हिडीओ पाहावा. त्यात कोणत्याही समाजाबद्दल कोणताही अपशब्द वापरला गेलेला नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
मी संस्कृतचा जाणकार आहे. मला काही प्रश्न समजले नसतील, तर त्याचं मी उत्तर मागू शकतो. काही संघटना माफी मागा म्हणत आहेत. कशाची माफी मागायची? जे मला माफी मागा म्हणतायत, त्यांना माझा साधा प्रश्न आहे. आपल्या राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंबद्दल जे बोलले, त्यावर तुम्ही काही बोलले नाही. मी राजकारणात नंतर आहे, माझा पिंड समाजकारणाचा आहे. राजमाता जिजाऊंची राजा शिवछत्रपतीमध्ये जी बदनामी केली गेली, यावर या लोकांनी माफी मागावी. त्यानंतर मी माफी मागायला तयार आहे असे आव्हानही त्यांनी यावेळी दिले.
