Breaking News

गृहमंत्री वळसे-पाटील म्हणाले, कायदा व सुव्यवस्थेत त्रुटी… न्यायालयाचा निकाल आल्यानंतर गृहमंत्री वळसेंची प्रतिक्रिया

काही एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक या निवासस्थानावर हल्ला करत आंदोलन केले. यावेळी आंदोलन कर्त्यांनी बंगल्याच्या दिशेने चपला आणि दगडफेकही केली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी पोलिसांनी वकील गुणरत्न सदावर्ते आणि १०९ आंदोलनकर्त्यांना अटक करून न्यायालयातही हजर केले. त्यावर न्यायालयाने या साऱ्यांना कोठडी दिली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी कायदा व सुव्यवस्थेत त्रुटी राहील्याची स्पष्ट कबुली देत त्यात जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला.

विशेष म्हणजे आज सकाळपासूनच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेस नेते तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पोलिसांच्या क्षमतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केल्यानंतर आता दस्तुरखुद्द गृहमंत्री वळसे-पाटील यांनीही त्रुटी असल्याची कबुली दिली.

गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले, सविस्तर निकाल आल्यानंतर प्रतिक्रिया देता येईल. आता सद्यस्थितीत न्यायालयाने हा निर्णय दिलेला आहे. माझं एवढच सगळ्या एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन आहे, की उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आहे आणि निर्णयाच्या नंतर काल जी घटना घडली. त्याप्रमाणे जो काही कायद्यानुसार निर्णय करणे आवश्यक होतं तो केलेला आहे. आता आपण सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे, सहकार्य करून त्यातून मार्ग काढला पाहिजे.

तसेच, शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांना मी भेटलो. मुख्यमंत्र्यासोबत हीच चर्चा झाली की, काल जो काही प्रकार घडला त्याला नक्की कोण जबाबदार आहे. कुठे कमतरता राहिली, त्यावर पुढे काय निर्णय घ्यायचा या संदर्भात चर्चा केली आणि याबाबतची सगळी चौकशी करून योग्य तो निर्णय आम्ही त्यामध्ये घेऊ असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

याचबरोबर कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भात ज्या त्रूटी दिसून आलेल्या आहेत. त्या संदर्भात जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *