एसटी कर्मचाऱ्यांचे एकही अधिवेशन मी चुकविले नाही. जेव्हा जेव्हा त्यांचा प्रश्न समोर आला त्यासाठी पुढाकार घेतला. काही कर्मचाऱ्यांनी चुकीचे पाऊल उचलले. तरीही आम्ही एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी असल्याची स्पष्टोक्ती शरद पवार यांनी देत पण त्यांच्या चुकीच्या नेतृत्वाच्या पाठीशी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानावर केलेल्या हल्ल्यानंतर ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते आणि कार्यकर्त्ये हजर होते.
टोकाची भूमिका घेण्याची परंपरा महाराष्ट्रात नाही. त्यामुळे जो काही प्रश्न असेल तो चर्चेद्वाराच सोडविला जातो. एसटी कर्मचाऱ्यांकडून जे काही चुकीचे घडवून आणण्यात येत आहे. त्यास एसटी कर्मचाऱ्यांचे चुकीचे नेतृत्व कारणीभूत आहे. त्यामुळे होणाऱ्या परिणामांनाही त्यांचे चुकीचे नेतृत्वच जबाबदार असून एसटी कर्मचाऱ्यांच्या ज्या काही आत्महत्या झाल्या त्यास हे चुकीचे नेतृत्वच कारणीभूत असल्याचा आरोपही त्यांनी भाजपा नेते आणि अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचे नाव न घेता त्यांच्यावर केला.
एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आम्ही सदैव उभे राहीलो असून यापुढेही उभे राहू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
तसेच घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते, कार्यकर्त्ये ही तात्काळ हजर झाल्याचे मी पाहिले. त्यामुळे संकटाचा काळात आपण एकत्र येतो हे ही मी पाहिले असून आपण असेच एकत्र राहु असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
चुकीच्या नेतृत्वामुळे एसटी कर्मचाऱ्यांना वेतन सोडून मागील चार-पाच महिन्याहून अधिक काळ रस्त्यावर यावं लागलं. त्यांना विना वेतन रहावं लागल्याने कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियावर आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. मात्र या सगळ्या दुष्यपरिणामास त्यांचे चुकीचे नेतृत्वच कारणीभूत आहे. मात्र यामुळे कर्मचाऱ्यांच्या मनात जो काही रोष निर्माण झाला तो त्यांना कुठे तरी व्यक्त करायचा होता. तो त्यांनी येथे व्यक्त केला असेही त्यांनी सांगितले.
ही प्रतिक्रिया व्यक्त दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे आपल्या पुढील नियोजित कार्यक्रमासाठी दौऱ्यावर निघुन गेले.
दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांबरोबरच महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र या हल्ल्यानंतर काँग्रेसकडून कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आली नाही.
तर हल्ल्याचे वृत्त कळताच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपली भूमिका मांडल्यानंतर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओक या निवासस्थानी पोहोचले.
