Breaking News

भाजपाचा पलटवार, शेंबडं पोर तरी विश्वास ठेवेल का? संजय राऊतांच्या टीकेला चंद्रकांत पाटील यांचे उत्तर

राज्यसभा निवडणूकीकरीता संभाजी राजे आणि शिवसेनेतील बोलणी फिस्कटल्यानंतर आणि त्यानंतर संभाजी राजे यांनी मुख्यमंत्र्यावर आरोप केल्यानंतर भाजपाकडून शिवसेनेवर टीकेची झोड उठविली. या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय राऊत यांनी संभाजी राजे आणि आमच्या पक्षातील हा विषय इसून इतरांनी चोंबडेपणा करू नये असा खरमरीत टोला लगावला. तसेच चंद्रकांत पाटील हे शिवाजी महाराजांचे वंशज आहे का? असा सवाल करत चंद्रकांत पाटील यांना निरूत्तुर करण्याचा प्रयत्न केला.

संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करत प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र ट्विटवरून प्रत्युत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी संज राऊत यांचे प्रत्यक्ष नाव घेण्याचे टाळले आहे.

संजय राऊत यांना प्रत्युत्तर देताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, मी शिवाजी महाराजांचा वंशज नाही, हे सामान्यज्ञान आहे. पण हिंदुत्वविरोध्यांसोबत चाललेल्यांना शिवरायांची मक्तेदारी कुणी दिली? तुम्ही शब्दांचे पक्के आणि बाकीचे सगळेच खोटारडे, यावर शेंबडं पोर तरी विश्वास ठेवेल का? आणि हो… सगळीकडे ढवळाढवळ करण्याचा अधिकार विश्वप्रवक्त्यांना कुणी दिला? असा खोचक सवालही केला.

संजय राऊत नेमके काय म्हणाले…

चंद्रकांत पाटील शिवाजी महाराजांचे वंशज आहेत का? त्यांनी २०१९ ला आम्हाला दिलेला शब्द मोडल्याबद्दल आधी खुलासा करावा. तेव्हा कुणी शब्द दिला होता आणि कुणी मोडला? हा संभाजीराजे आणि आमच्यातला विषय आहे. इतरांनी चोंबडेपणा करू नये. देवेंद्र फडणवीसांनी संभाजीराजेंना लागणारी ४२ मतं द्यावीत. आमच्या पक्षाच्या निर्णयाबाबत आम्ही त्यांना उत्तर का द्यायचं? असा सवाल संजय राऊतांनी केला होता.

तसेच सगळ्यांना माहित आहे की, शिवसेना एकदा शब्द दिला की तो शब्द मोडत नाही. दिलेल्या शब्दाला जागण्याची परंपरा शिवसेनेची असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, शिवसेनेकडून अपक्ष उमेदवारीला पाठिंबा न मिळाल्यामुळे संभाजीराजे छत्रपती यांनी ही राज्यसभा निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केले. त्याचबरोबर या निवडणूकीत घोडेबाजार होवू नये यासाठी आपण निवडणूकीतून माघार घेत असल्याचे संभाजी राजे यांनी काल पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडताना सांगितले.

Check Also

‘राष्ट्रासाठी राष्ट्रवादी’ या संकल्पनेवर आधारित राष्ट्रवादीचा जाहिरनामा…

राज्यातील सर्व समाजघटकांना… अठरापगड जाती आणि बारा बलुतेदार यांचा विचार करणारा आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *