राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत संशयातीत बहुमत मिळविलेल्या महायुतीत सत्ता स्थापनेच्या आधीच करबुरी वाढायला लागल्या आहेत. आधीच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपातील देवेंद्र फडणवीस यांच्यात मुख्यमंत्री पदावरून सुप्त संघर्ष सुरु झाला आहे. त्यामुळे दिल्लीत महायुतीचे तिन्ही नेते भाजपा नेते अमित शाह यांना मंत्री वाटपावरून भेटले तरी तिघांपैकी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसत होते. तर एकनाथ शिंदे यांचा चेहरा पडल्याचे दिसून येत होता. त्यामुळे दिल्लीहून आल्या आल्या एकनाथ शिंदे हे महायुतीतील मंत्री पदाच्या बैठकीला उपस्थित राहण्यापेक्षा आपल्या दरे गावी जाणे पसंत केले. त्यामुळे महायुतीच्या मंत्री पद वाटपाची बैठक होऊ शकली नाही. त्यातच दुसऱ्याबाजूला अजित पवार यांच्या पक्षाचे प्रवक्ते अमोल मिटकरी आणि शिंदे यांच्या शिवसेनेचे माजी मंत्री गुलाबराव पाटील यांच्यात आता वाद रंगला आहे.
हा वाद रंगण्याचे कारण म्हणजे गुलाबराव पाटील यांनी आज अजित पवार आणि त्यांच्या पक्षाचे नाव घेत म्हणाले की, जर अजित पवार आमच्यात आले नसते तर आमच्या महायुतीच्या जागा भाजपा-शिवसेनेच्या त्यातही शिंदे शिवसेनेच्या ९० ते १०० जागा सहज निवडून आल्या असत्या असा दावा केला.
गुलाबराव पाटील यांनी केलेल्या दाव्याला अजित पवार यांच्या पक्षाचे प्रवक्ते अमोल मिटकरे यांनी जशास तसे उत्तर देत म्हणाले की, अजित पवार हे जर आले नसते तर शिंदे गटाच्या ९० ते १०० जागा आल्या असत्या हा गुलाबराव पाटील यांचा गोड गैरसमज आहे. त्यांनी उगाच महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये असा टोलाही यावेळी लगावला.
पुढे बोलताना अमोल मिटकरी म्हणाले की, महायुती म्हणून आपण सगळे एकत्र आलो. निवडणूक एकत्र लढलो. आता एकत्र राहिलो पाहिजे. शेवटी अजित पवार यांनी घेतलेली मेहनत दुर्लक्षित करता येणार नाही. तिन्ही पक्षांनी निवडणूक जिंकण्यासाठी खुप मेहनत घेतली. आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मेहनत नाकारत नाही. देवेंद्र फडणवीस यांनी केलेली मेहनतही नाकारत नाही. आम्हाला ठाऊक आहे की, तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी आणि पक्षाने व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खूप कष्ट घेतले आहेत. मोठ्या मेहनतीने आपल्याला निवडणूकीत यश मिळाले आहे. चांगल्या पद्धतीने सत्ता आणल्यावर अशा प्रकारे युतीत कोणी मिठाचा खडा टाकू नये असा टोलाही यावेळी लगावला.
अमोल मिटकरी पुढे बोलताना म्हणाले की, शिंदे शिवसेनेचे रामदास कदम असतील किंवा गुलाबराव पाटील असोत. त्यांनी अजित पवार यांना उगीच टार्गेट करू नये. महायुतीत वितुष्ट निर्माण करू नये. गुलाबराव पाटील यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की, त्यांच नाव गुलाबराव आहे. त्यांनी त्यांच्या नावासारखं रहावं हल्ला त्यांच्या नावाचा सुगंध कमी झालेला दिसतोय. मंत्रिमंडळात त्यांची वर्णी लागतेय की नाही याबाबत जरा शंका आहे. त्यामुळे ते अशी वक्तव्य करत असावेत, पण माझं सांगण आहे की गुलाबराव सारखं रहा उगाच जुलाबराव होऊ नका असा उपरोधिक टोलाही यावेळी लगावला.