Breaking News

पवारांच्या राजीनामा प्रकरणावर उध्दव ठाकरे यांची स्पष्टोक्ती, महाविकास आघाडीला तडा जाईल… मी सल्ला देऊ शकत नाही

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. यासंदर्भात उद्धव ठाकरेंची कोणतीही प्रतिक्रिया कालपासून समोर आली नव्हती. तसेच लोक माझे सांगाती या पुस्तकात मुख्यमंत्री पदी असताना उध्दव ठाकरे यांच्या कारभारावरून केलेल्या टीकेवर अखेर आज दुपारी मातोश्रीवर माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरेंनी शरद पवारांच्या राजीनाम्यावर आणि पुस्तकातील उल्लेखावरून प्रतिक्रिया दिली. तसेच, उद्या अध्यक्ष निवड समितीच्या बैठकीत काय निर्णय होतो, याकडेही लक्ष असल्याचं ते म्हणाले.

यावेळी बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले, मला वाटतं की प्रत्येक पक्षाला पक्षांतर्गत व्यवस्थापन काय असावं, हे ठरवण्याचा अधिकार असतो. मला वाटतं की महाविकास आघाडीला कुठेही तडा जाईल अशी कोणतीही गोष्ट राष्ट्रवादीत घडेल असं मला वाटत नाही, मी त्यांना कोणता सल्ला देऊ शकत नाही. मी दिलेला सल्ला त्यांना पटला नाही तर काय करणार? उद्या त्यांचा निर्णय होऊ द्या. त्यानंतर काय ते बोलेन, असंही यावेळी नमूद केले.

तसेच उध्दव ठाकरे म्हणाले, महाविकास आघाडीला माझ्याकडून तडा जाणार नाही याची काळजी मी घेईन. तसं मी काही बोलणार नाही किंवा करणार नाही. पण मी असंही म्हणेन, की देशात हुकुमशाही येणार नाही असं मानणाऱ्या लोकांची एकता व्हायला हवी. मी व्यक्तीचा पराभव करायला मागत नाही, वृत्तीचा पराभव करायची इच्छा असते. त्यासाठीच हुकुमशाही वृत्तीचा पराभव करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावं असं माझं म्हणणं आहे, असंही स्पष्ट केले.

उद्धव ठाकरेंनी फक्त दोन वेळा मंत्रालयात जाणं आपल्याला आवडलं नसल्याचा उल्लेख शरद पवारांनी त्यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकात केल्यावरून राजकीय चर्चा सुरू झाली होती. त्यावरही उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हणाले, प्रत्येकाला आत्मचरित्र लिहिण्याचा अधिकार असतो. मी मुख्यमंत्री म्हणून काय केलं हे जगजाहीर आहे. प्रत्येक कुटुंबाला मी त्यांच्या कुटुंबातला एक सदस्य वाटतो. यापलीकडे काही बोलणं योग्य नाही, असे सांगत शरद पवारांच्या टीकेवर अधिक बोलणे टाळले.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *