अपक्ष आमदार आणि छोट्या पक्षानी मतदान केले नाही. त्यामुळे राज्यसभा निवडणूकीत शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराचा पराभव झाला असा आरोप शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी करत पराभवाचे खापर बहुजन विकास आघाडी पक्षासह अपक्ष आमदार देवेंद्र भुयार आणि संजय मामा शिंदे यांच्यावर केला. राऊत यांच्या आरोपानंतर या दोन्ही अपक्ष आमदारांनी संजय राऊतांवर पलटवार करत देवेंद्र भुयार म्हणाले की, संजय राऊत हे ब्रम्हदेव आहेत का? असा सवाल तक्रार कुटुंबप्रमुखाकडे करायची का दाऊद इब्राहीम याच्याकडे करायची अशी खोचक टीकाही केली. तर संजय मामा शिंदे यांनी विश्वास नव्हता तर मतदानालाच कशाला नेले असा सवाल करत सर्व नेते उपस्थित असताना असा कोणताही प्रकार झाला नाही. आणि मतदान केल्यानंतर असा आरोप करणे चुकीचे असल्याचा प्रत्युत्तर दिले.
संजय राऊत हे ब्रम्हदेव आहेत का हे समजत नाही. मतदान हे गोपनीय असते. आम्ही त्यांना मत दिले नाही हे त्यांना कसे कळले. ज्यावेळी महाविकास आघाडी झाली त्यामध्ये शिवसेना नंतर आली. लोकसभा निवडणुकीपासून मी महाविकास आघाडीसोबत आहे. शिवसेना नंतर आली आहे. त्यामुळे कोणी मतदान दिले नाही असे सांगण्याचा अधिकार संजय राऊतांना नाही. मी पहिल्या दिवसापासून दगाफटका केलेला नाही. माझी मुख्यमंत्र्यावर नाराजी आहे पण वैयक्तिकरित्या नाही. माझ्या मतदार संघातील प्रश्न सोडवण्यात मुख्यमंत्री कमी पडले ही खंत मी बोलून दाखवली. बोलून दाखवल्याशिवाय त्यांना कसे कळणार आहे. मुख्यमंत्री कुटुंब प्रमुख आहेत. मग कुटूंबप्रमुखाला सांगायचे नाही तर दाऊद इब्राहिमला सांगायचे का? असा सवाल करत त्यामुळे त्यांच्या पक्षावर किंवा उमेदवारावर नाराजी आहे असे होत नाही असा खुलासाही देवेंद्र भुयार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.
त्यांना विश्वास नव्हता तर आम्हाला मतदानासाठी घेऊन जायचे नव्हते. नेतेमंडळी आमच्यासोबत असताना असा आरोप करणे चूकीचे आहे. आमचा विश्वासच पाहायचा होता तर आम्हाला थांबवून ठेवायचे होते. घोडेबाजार झाला असता तर आम्ही शिवसेनेला मत दिले नसते असे संजयमामा शिंदे यांनी पलटवार केला.
आम्ही महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे आणि असा कोणताही प्रकार झालेला नाही. मतदानाच्यावेळी तुमचे नेते आमच्यासोबत होते. ज्या सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे मतदान केले. पराभवानंतर आरोप करणे चूकीचे आहे. हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कानावर घालणार आहे. महाविकास आघाडीला पाठिंबा देताना आम्ही घोडेबाजारावर दिला नव्हता. त्यांनी मला पक्षात प्रवेश करण्याची ऑफर दिली होती. तसेच मंत्रीपदाची ऑफरही दिली होती असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.
